आघाडीच्या मोबाईल कंपन्या २जी फोनचे उत्पादन थांबवणार

combo
नवी दिल्ली – देशातील २जी फोनचे उत्पादन आणि विक्री भारतातील आघाडीच्या मोबाईल कंपन्या सॅमसंग आणि मायक्रोमॅक्स या बंद करणार आहेत. ३जी आणि ४जी या आधुनिक श्रेणीतील फोनच्या उत्पादनावर या दोन्ही कंपन्यांनी भर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या फोनच्या किमतीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झाली आहे. लवकरच स्वस्तामध्ये ४जी मोबाईल रिलायन्स जिओ बाजारात आणणार असल्याने त्याला टक्कर देण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

४जी तंत्रज्ञानावर देशभरामध्ये आता दूरसंचार कंपन्या या भर देत असल्याने या फोनच्या किमती गेल्या वर्षभरामध्ये उतरल्या आहेत. मायक्रोमॅक्सच्या ४जी मोबाईल विक्रीमध्ये ३० टक्के वाढ झाली आहे. सध्या कंपनी १४ मॉडेलची विक्री करत असून मार्च अखेरीस ती संख्या २० पर्यंत पोहोचणार आहे, असे मायक्रोमॅक्स इन्फोमॅटिक्सचे सीईओ विनीत तनेजा यांनी सांगितले. २जी फोनच्या विक्रीमध्ये घट होत आहे. जुलै-ऑगस्ट या तिमाहीमध्ये २जी फोनच्या विक्रीमध्ये फक्त ९ टक्के वाढ झाली, तर गेल्यावर्षी या कालावधीमध्ये ती २५ टक्के होती. तसेच काही दुरसंचार कंपन्यांनी 4जी ची सेवा ३जी च्या किमतीमध्ये देतात. ४जी सेवा असलेले फोन आता पाच हजारामध्ये मिळत असल्याने अनेकजण 2जी किंवा ३जी पेक्षा ४जी फोन घेणे पसंद करतात. तसेच पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये इन्टेक्ससुद्धा आपल्या 2जी फोनची विक्री बंद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment