नानकाई विद्यापीठातील संशोधकांनी चीनमध्ये माईंड कंट्रोल कार विकसीत केली असून अशा प्रकारची देशातील ही पहिलीच कार असल्याचा दावा केला आहे. ही कार ब्रेन पॉवरवर चालणार आहे. ही कार चीनच्या ग्रेट वॉल मोटर्सच्या सहकार्याने बनविली गेली आहे.
चीनमध्ये बनली ब्रेन पॉवर्ड कार
संशोधन प्रमुख जँग जाओ या संदर्भात माहिती देताना म्हणाले ही कार म्हणजे स्वप्नातली कारच आहे. फक्त हे स्वप्न सत्यात उतरले आहे. यासाठी चालकाला ब्रेन सिग्नल रिडींग उपकरण घालावे लागते. त्यात १६ सेंसर आहेत. हे सेंसर मेंदूचे सिग्नल पकडतात मात्र त्यातील जरूर तेवढेच सिग्नल निवडून ते भाषांतरीत केले जातील असा त्याचा प्रोग्रॅम बनविला गेला आहे. यामुळे चालक हात अथवा पाय न वापरता गाडी लॉक, अनलॉक करणे, मागे पुढे नेणे, थांबविणे व कारवर नियंत्रण मिळविणे ही कामे करू शकतात. गेली दोन वर्षे हे संशोधन सुरू होते.
तज्ञांच्या मते लवकरच ब्रेन कंट्रोल व चालक विरहित कार यातील तंत्रज्ञान एकत्र जोडून पूर्णपणे स्वनियंत्रित कार बनविता येऊ शकेल. सध्याच्या ब्रेन पॉवर्ड कारमध्ये चालकाच्या मेंदूत दुसरे विचार सुरू असले तरीही अपघात होण्याचा धोका नाही. कारण सेन्सर कार नियंत्रणासाठी आवश्यक तेवढेच सिग्नल पकडणार आहेत. या कारमध्ये अजून खूप सुधारणा बाकी आहेत. सध्या ही कार फक्त सरळ रेषेतच जाऊ शकते आहे.मात्र भविष्यात ती परिपूर्ण असेल आणि जगातील अपंग व्यक्तींसाठी ती वरदान ठरेल.