इंदिरा गांधींचा वारसा

combo1
सोनिया आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेरॉल्ड भ्रष्टाचार प्रकरणात आपण पुरते अडकलो आहोत हे लक्षात आल्यानंतर आता या संबंधात हौतात्म्याचा आव आणायला सुरूवात केली आहे. खरे म्हणजे त्यांनी न्यायालयात हजर राहण्याच्या बाबतीत आपल्याला सूट मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. पण हे प्रयत्न फोल झाल्यानंतर आता मात्र, मी इंदिरा गांधींची सून आहे असे उद्गार काढून आपण न्यायालयात हजर राहण्यास तयार आहोत असा आव आणला आहे. त्या खरोखर न्यायालयात हजर राहायला तयारच होत्या तर त्यांनी सप्टेंबरमध्येच त्या न्यायालयाचा आदेश मिळाल्याबरोबर अशी घोषणा करायला हवी होती.

परंतु नाईलाज झाल्यानंतर आता अशा वल्गना करायला सुरूवात केली आहे ती फुकाची आहे. अशा हौतात्म्याच्या वल्गनांनी कोणीही फशी पडणार नाही. मुळात आता इंदिरा गांधींच्या वारशाची आठवण व्हावी असे काही औचित्यच नाही. इंदिरा गांधींना अटक झाली होती आणि त्या एक दिवस तिहार तुरुंगात राहून आलेल्या होत्या. मग सोनिया गांधी इंदिरा गांधींची आठवण काढून नेमके काय सांगू इच्छित आहेत? इंदिरा गांधींनी अटकेनंतर उचल खाल्ली आणि बदनामीच्या रुपात का होईना पण त्या प्रकाशात आल्या. त्याचे राजकीय फायदे त्यांनी मिळवले. आणीबाणीचा कलंक पुसून त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. अशा रितीने आपणही सध्याच्या उपेक्षेच्या अंधारातून बाहेर पडू अशी आशा सोनिया गांधी यांना वाटत असावी. मात्र तशी शक्यता आता तरी दिसत नाही.

नाही म्हटले तरी इंदिरा गांधी यांच्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईपैकी एक कारवाई फौजदारी स्वरूपाची होती आणि दुसरी पूर्णपणे राजकीय स्वरूपाची होती. शेवटी इंदिरा गांधी ह्या इंदिरा गांधीच होत्या. त्यांच्या नावाचे लघुरूप इंगा असे होते. म्हणजे त्या भल्या भल्या लोकांना इंगा दाखवण्यात वाकब्गार होत्या. सोनिया गांधी तशा नाहीत. त्यांच्यावरची आता होत असलेली कायदेशीर कारवाई ही पूर्णपणे फौजदारी स्वरूपाची, आर्थिक गैरव्यवहाराची आणि त्या गैरव्यवहारासाठी केेलेल्या कागदपत्रांच्या हेराफेरीची आहे. अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी असूनसुध्दा त्या सरकारवरच सूड भावनेचा आरोप करत आहेत आणि या खटल्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे सारे डावपेच निरुपायापोटी होत आहेत. त्यामुळे त्यात चातुर्यसुध्दा दिसत नाही.

Leave a Comment