भारतीय लघु उद्योगांसाठी ‘अलिबाबा’चे ‘स्माईल’

alibaba
मुंबई: भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्यासह सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी जगातील आघाडीची चिनी ई कॉमर्स कंपनी ‘अलिबाबा डॉट कॉम’ या कंपनीने पुढाकार घेतला आहे.

‘अलिबाबा’वर नोंदणीकृत असलेल्या भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांना सहकार्य करण्यासाठी कंपनीने ‘स्मॉल अँड मिडीयम इंडस्ट्रीज लिव्हरेजिंग एक्स्पोर्ट’; अर्थात ‘स्माईल’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, क्रिसील रेटिंग, टॅली, कॅपिटल फ्लोट जीना, एसजीएस आणि माय पॅको या विविध क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या अलीबाबाच्या भागीदार आहेत.

या प्रकल्पांतर्गत लघु आणि मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा, मानांकन (क्रेडीट रेटींग), ऑनलाईन पतपुरवठा, वाहतूक अशा अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांची व्यवसायाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने ‘अलिबाबा’ने ‘स्माईल’ हा प्रकल्प हाती घेतला असून ‘अलिबाबा’वर नोंदणी करणाऱ्या सर्व उद्योगांना या माध्यमातून अनेक प्रकारच्या दर्जेदार सुविधा सुलभतेने उपलब्ध होणार आहेत; असे कंपनीच्या जागतिक व्यवसायवृद्धी विभागाचे प्रमुख टीमोथी ल्युंग यांनी सांगितले.

‘स्माईल’ अंतर्गत भारतातील तब्बल १ कोटी लघु व मध्यम उद्योगांना सुविधा उपलब्ध करून देता येतील; असे ल्युंग यांनी सांगितले. सध्या ‘अलिबाबा डॉट कॉम’वर ४५ लाख लघु व मध्यम उद्योगांनी नोंदणी केली आहे. ‘अलिबाबा’ने ‘स्नॅपडील’ आणि ‘पेटीएम’मध्येही गुंतवणूक केली आहे.

भारतीय लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये मोथी क्षमता असूनही अद्याप या क्षेत्राचा पूर्ण कार्यक्षमतेने विकास करण्यात आलेला नाही. मात्र जागतिक कंपन्यांना या क्षेत्राच्या क्षमतेची जाणीव झाली आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी ‘फेसबुक’ने भारतात ‘एसएमइ कौन्सिल’ची घोषणा नुकतीच केली आहे. अमेरिकेबाहेर स्थापन होणारी ही पहिली कौन्सिल ठरणार आहे. लघु उद्योगांना कर्ज सुविधा देण्यासाठी ‘पेटीएम’ने ‘लेंडिंगकार्ट’शी भागीदारी केली आहे.

Leave a Comment