पन्नास हजारपर्यंतच्या परताव्याचे दावे लवकर निकाली काढा

cbdt
नवी दिल्ली : आयकर परतावा मिळण्यासाठी अनेक दिवस वाट पहावी लागते. मात्र यापुढे त्यांना अशी वाट पहावी लागणार नाही. आयकर विभागाच्या अधिका-यांना केंद्र सरकारने ५० हजार रुपयांपेक्षा कमी आयकर परताव्याचे दावे लवकरात लवकर निकाली काढावेत असा आदेश दिल्यामुळे आयकर विभागाकडून मिळणा-या परताव्याची वाट पाहणा-या लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

५० हजार रु. पेक्षा कमी जर आपली रक्कम असेल तर परताव्याची रक्कम तात्काळ आपल्या खात्यात जमा होणार आहे. परताव्याच्या रकमेबाबत केंद्र सरकारच्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात होती. त्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) ने आर्थिक वर्ष २०१३-१४ आणि २०१४-१५ साठी ५० हजारपेक्षा कमी परताव्याची रक्कम तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत.

शक्य तितक्या लवकर परताव्याबाबतची प्रक्रिया सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर, बेंगळूर यांनी पूर्ण करावी, असे निर्देश सीबीडीटीने दिले आहेत. सीबीडीटीकडून करदाता अनुकूल प्रणालीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर भरणा करणा-यांच्या समस्या आणि तक्रारी वेगाने सोडवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Comment