एखाद्या कुटुंबात काही दुर्घटना घडते किंवा घातपात होतो तेव्हा ते कुटुंब प्रामुख्याने सीबीआयकडून घटनेची चौकशी व्हावी अशी आग्रहाची मागणी करत असते. दादरी प्रकरणात मात्र पीडित कुटुंबातील लोक सीबीआय चौकशी थांबवावी अशी मागणी करत आहेत. या विचित्र मागणीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण दादरीमध्ये झालेली हत्या ही हिंदू-मुस्लीम वादातून झाली नसून तिच्यामागे वेगळेच काही कारण असल्याचे सीबीआयच्या चौकशीतून निष्पन्न होण्याची शक्यता दिसायला लागली आहे. मृत अखलाक याची हत्या गोमांसावरून झालेली नाही. स्थानिक स्वरूपाच्या काही संघर्षातून काही लोकांनी ही हत्या केली आहे. असे सीबीआयला आढळायला लागले आहे. हे जर सत्य असेल तर या हत्येच्या घटनेला हिंदू विरुध्द मुस्लीम असे स्वरूप देण्याचे औचित्यच उरणार नाही.
दादरीत नेमके काय घडले?
ही घटना घडलेल्या खेड्यामध्येच मुस्लीम कुटुंबे भयभीत झाली. त्यातल्या एका कुटुंबात विवाह समारंभ होता. मात्र त्यांनी तो विवाह समारंभ दुसर्या गावात करण्याचे ठरवले. ही गोष्ट गावातल्या हिंदूंना कळली तेव्हा त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली आणि हा विवाह समारंभ याच गावात झाला पाहिजे असा आग्रह तर धरलाच पण या समारंभाला गावातले हिंदू संरक्षण देतील अशी ग्वाही दिली. एवढेच नव्हे तर तो समारंभ गावात हिंदूंच्या संरक्षणाखाली थाटात पार पडला. अर्थात संरक्षणाची गरज नव्हतीच. मुस्लिमांना कसली भीती नव्हतीच. कारण या गावात मुळात हिंदू-मुस्लीम वैरच नाही. गावातल्या एका पूर्ववैमनस्याच्या घटनेतून ही हत्या झालेली आहे. मात्र तिला हिंदू विरुध्द मुस्लीम असे स्वरूप काही लोकांनी दिले आहे.
भारतात हिंदू आणि मुस्लीम यांच्यात सलोख्याचे संबंध राहिले तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदू-मुस्लीम सुखाने नांदत आहेत असे चित्र तयार होईल अशी भीती काही लोकांना वाटते. हे दृश्य आजवर त्यांनी निर्माण केलेल्या मोदींच्या प्रतिमेशी विसंगत आहे. त्यामुळे माध्यमातले आणि राजकारणातले मोदी विरोधी घटक देशात हिंदू-मुस्लीम सुखाने नांदत नाहीत असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच लोकांनी दादरीच्या वैयक्तिक वैमनस्याच्या घटनेला हिंदू-मुस्लीम वैराचे स्वरूप दिले आणि बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला अतिरंजित रुप दिले. आता मात्र सीबीआयच्या चौकशीतून सत्य बाहेर येण्याची शक्यता दिसायला लागली आहे आणि हिंदू-मुस्लीम ज्यांना देखवत नाही त्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.