चेन्नई : तामिळनाडूत झालेल्या मुसळधार पावसामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तब्बल ११ हजार २०० बाईक्सचा तोटा लोकप्रिय असलेल्या रॉयल एन्फिल्डला सहन करावा लागला आहे.
चेन्नई पावसाचा रॉयल एन्फिल्डला फटका
चेन्नईजवळ असलेल्या दोन प्लांट्समध्ये नुकतेच रॉयल एन्फिल्डने उत्पादनाला पुन्हा सुरुवात केली असून चेन्नईतील मुसळधार पाऊस आणि पुरामुळे प्रॉडक्शन बंद करण्यात आले होते. कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि स्थानिक सप्लायर्सच्या समस्यांमुळे या आठवड्यात ५० टक्के काम होईल, मात्र पुढच्या आठवड्यात पुन्हा १०० टक्के उत्पादन सुरु करण्याची योजना असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. १ डिसेंबरपासून ६ दिवसांसाठी बुलेटचे प्रॉडक्शन बंद राहिले होते.
कुठल्याही सामग्रीला किंवा प्रॉपर्टीचे नुकसान झाल्याची प्रथमदर्शनी माहिती नाही. कंपनीचे सर्व कर्मचारीही सुरक्षित आहेत. मात्र कंपनीला ११ हजार २०० बाईक्सचा तोटा सहन करावा लागला, असे रॉयल एन्फिल्डतर्फे एका पत्रकात म्हटले आहे. चेन्नईमध्ये रॉयल एन्फिल्डप्रमाणेच फोर्ड, हुंडाई, निसान, यामाहा, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रेनॉल्ट, फोक्सवॅगन यासारख्या अनेक कंपन्यांना फटका बसला आहे.