बीजिंग: ‘एपीयुएस ग्रुप’ या चीनमधील आघाडीच्या मोबाईल अॅप उत्पादक कंपनी नव्या उद्योगांना सहकार्य करणाऱ्या ‘स्टार्ट अप’साठी भारतात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ‘एपीयुएस ग्रुप’मध्ये गुंतवणूक असलेल्या नॉर्दन लाईट व्हेंचर्स कॅपिटल, रेडपॉईंट व्हेंचर्स, शेंग्वी व्हेंचर्स, एसआयजी ग्लोबल आणि क्विमिंग व्हेंचर्स या कंपन्याही या प्रकल्पात गुंतवणूक करणार आहेत.
‘एपीयुएस ग्रुप’ची भारतात ‘स्टार्ट अप’साठी ३०० कोटीची गुंतवणूक
जून २०१४ मध्ये स्थापन झालेल्या ‘एपीयुएस ग्रुप’चे जगभरात ५ कोटी १० लाख उपभोक्ते असून त्यापैकी ३ कोटी भारतात असल्याचा कंपनीचा दावा आहे. अँड्रोईड विकसित करणाऱ्या ‘एपीयुएस युजर सिस्टीम’चाही कंपनीच्या ‘एपीयुएस ग्रुप’च्या अॅपमध्ये समावेश आहे.
भारतात सध्या केवळ १९ टक्के लोक इंटरनेट वापरत असले तरी जगभरातील इंटरनेट वापर कर्त्यांचा विचार करता भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. सन २००७ पर्यंत किफायतशीर दरात उपलब्ध होणारे स्मार्टफोन आणि डाटा कनेक्शन यामुळे भारतातील इंटरनेट वापर कर्त्यांची संख्या ५० कोटीपर्यंत पोहोचेल; असा इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशनचा कयास आहे.