जनुक बदलाचे शास्त्र

genetically
वॉशिंग्टनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या औषध परिषदेत मानवतेच्या इतिहासातल्या एका क्रांतीकारक संशोधनावर व्यापक चर्चा झाली आणि त्याबाबतीत जगातल्या पुढारलेल्या शास्त्रज्ञांचे एकमतही झाले. ते संशोधन म्हणजे जनुक बदलातून रोगांचे निवारण. मानवाच्या अनेक विकारांपैकी काही विकार हे त्याची चूक नसताना त्याला होतात. म्हणजे मधुमेहाचासारखा विकार हा आनुवंशिक असतो. आईवडिलांना मधुमेह असला की तो मुलामध्ये आपोआपच उतरतो. त्यामध्ये मुलाची काही चूक नसते किंबहुना काही वेळा आजोबा आजींचा मधुमेहसुध्दा दुसर्‍या तिसर्‍या पिढीपर्यंत उतरत असतो. अनुवंशिकतेने होणारे विकार हे जनुकांमधून प्रसारित होत असतात.

म्हणून जन्मजात होणार्‍या अशा विकारांवर शास्त्रज्ञांनी जनुकीय बदल हा उपचार शोधून काढला. या तंत्रज्ञानाला क्रिस्प कास – ९ असे म्हटले जाते. या उपचारामध्ये जन्माला येणार्‍या बाळाला आनुवंशिकतेने एखादा विकार होण्याची शक्यता असेल तर त्याच्या जन्माच्या आधीच म्हणजे तो गर्भात असतानाच त्याच्या जनुकांमध्ये काही बदल केले जातात. एकदा जनुक बदलले की त्याला जन्मानंतर कसलाही आनुवंशिक विकार होण्याची शक्यता राहत नाही. अर्थात अशा प्रकारचे क्रांतीकारक तंत्रज्ञान निर्माण होताच त्याला विरोधही झाला.

कोणाचाही जन्म आणि त्याच्यात उतरणारे आनुवंशिक गुणधर्म हे निसर्गाचे काम आहे. त्यात माणसाने हस्तक्षेप करू नये असे काही लोकांचे मत आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून त्या वैद्यकीय तंत्रज्ञानाला विरोधही करायला सुरूवात केली होती. मात्र हे तंत्रज्ञान मानवतेसाठी वरदान असल्यामुळे त्याला विरोध करू नये यावर औषध परिषदेत एकमत झाले. मानवाने जनुकीय बदलात हस्तक्षेप केला तर त्याचे वाईट परिणाम होतील असे इशारे या तंत्रज्ञानाला विरोध करणारे लोक देत आहेत.

परंतु असे दुष्परिणाम प्रत्यक्षात कसे होतील आणि काय होतील याची शास्त्रीय माहिती या विरोधकांकडून कधीच दिली जात नाही. अशा प्रकारचा हस्तक्षेप घातक ठरेल ही भीती अटकळीवर आधारलेली आणि अंदाजपंचे वर्तवलेली आहे. मात्र या काल्पनिक भितीच्या कारणाने एका संशोधनाला सोडचिठ्ठी देणे किंवा बंधने घालणे हे उचित ठरणार नाही असे शास्त्रज्ञांचे एकमत आहे. खरे म्हणजे हे संशोधन येऊन बरीच वर्षे झाली होती पण त्याला अनेक हरकती असल्यामुळे ती प्रत्यक्षात राबवले जात नव्हते. आता मात्र त्याला गती येईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment