लंडन: भूगर्भापर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्याच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी हिंदी महासागराच्या तळाशी भूगर्भाचा छेद घेण्याचा प्रयत्न ब्रिटीश शास्त्रज्ञांनी सुरू केला आहे. आतापर्यंत भूपृष्ठ छेदून प्रत्यक्ष भूगर्भापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.
ब्रिटीश शास्त्रज्ञ घेत आहेत भूगर्भाचा वेध
भूपृष्ठाच्या आत पोहोचून भूगर्भातील खडकांचे नमुने घेण्याचा या शास्त्रज्ञांचा प्रयत्न आहे. त्यामुळे पृथ्वीच्या निर्मितीचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. त्याच प्रमाणे पृथ्वीवरील जीवसृष्टी जमिनीवर आणि महासागरातच आहे की भूपृष्ठाच्या खाली भूगर्भापर्यंतही काही सजीव अस्तित्वात आहेत; याचाही अभ्यास या प्रकल्पात केला जाणार आहे.
यापूर्वी देखील भूपृष्ठाच्या खाली खणती करून भूगर्भापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र कोणतेही प्रगत तंत्रज्ञान वापरून त्यात यश आले नाही. समुद्रतळापासून ५ किलोमीटरपर्यंत खणणे ही आजपर्यंत अशक्य असलेली बाब आहे. त्यामुळे ब्रिटीश शास्त्रज्ञांच्या या प्रयत्नांकडे विज्ञान जगताचे लक्ष लागले आहे.