‘जीएम’ पिकांमुळे येतील शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ : डॉ. मोरे

gm
पुणे: शाश्वत शेतीसाठी जैवतंत्रज्ञानाचा स्वीकार केलाच पाहिजे. त्यामध्ये काही दोष असतील तर ते दूर करता येतील. परंतु कोणत्याही तंत्रज्ञानाला दोष देऊ नका; असे आवाहन करतानाच ‘जीएम’ अर्थात जनुकीय बियाणांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील; असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी व्यक्त केले.

‘वनराई’ संस्थेच्या वतीने ‘संगम – २०१५’ ही राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी नेत्यांची एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली. त्याचा समारोप डॉ. मोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ‘कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर ऑफ असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष एच. पी. सिंग, महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेचे

उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर, ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मोरे म्हाणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘जीएम’ पिकांच्या सर्व चाचण्या नियम व अटी पाळून यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, अजूनही त्याच्याबाबत निर्णय झालेला नाही. संसदेची मान्यता मिळाल्यानंतर त्याचा विचार करू; असे सांगितले जात आहे. मात्र तोपर्यंत उशीर झाला असेल. ‘बीटी कॉटन’लाही असाच विरोध झाला होता. मात्र, नंतर ‘बीटी कॉटन’ हे फायदेशीर असल्याचे सिध्द झाले आहे.

परिषदेच्या डॉ. खर्चे, दूरदर्शन कृषी वाहिनीचे नरेश शिदोही, माजी आमदार पाशा पटेल, शेतकरी संघटनेचे अजित नरदे, मानवेंद्र काचोळे, रोप वाटिकातज्ञ सुरेश अमृते यांनी भाग घेतला.

या सत्रात बोलताना डॉ. खर्चे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आणि अर्थतज्ज्ञांनी शेतीच्या उत्पादनखर्चाबाबत कधीच विचार केला नाही. शेती हाही एक व्यवसाय आहे आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेशी गहिरा संबंध आहे; हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी सांगितले. सेंद्रीय शेतीच्या बाबतीत अनेक जण लिहितात व बोलतात. मात्र, सलग ३-४ वर्षे सेंद्रीय शेती केल्यानंतर ते फायदेशीर ठरल्याचे उदाहरण नाही; असा दावा करून डॉ. खर्चे म्हणाले की; जगाची लोकसंख्या ७०० कोटी आहे. त्यापैकी ७० कोटी जनता आजही संध्याकाळी उपाशी असते.

पाशा पटेल म्हणाले की, शेतीमध्ये लावलेला पैसा परत येत नाही; ही समस्या असताना आता हवामान बदलाची समस्या निर्माण झाली आहे. निसर्गाचे चक्र व्यवस्थित असतानाही शेतकऱ्यांचे भले झाले नाही; तर आता काय होणार हा खरा प्रश्न आहे. स्वामीनाथन समितीच्या शिफारशीमध्ये उत्पादन खर्च कसा काढावा याबाबत काहीच मार्गदर्शन नाही; याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, जमिनीची झीज होते याचा विचारच झालेला नाही.

इतर शेतकरी नेत्यांनीही जैवतंत्रज्ञानावर आधारित असलेल्या पिकांच्या चाचण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. कृषी जैवतंत्रज्ञानावर आधारित बीटी कॉटनमुळे जसा बदल झाला; तसा जीएम बियाणांच्या अंगीकाराने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल घडेल; असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.