मोदींच्या गोल्ड मोनेटायझिंग स्कीमवर तिरूपतीचा वरदहस्त?

tirupati
भारतातील घरामंदिरात पडून असलेले सुमारे २० हजार टन सोने वापरात यावे आणि सोनेप्रेमामुळे सोने आयातीवर करावा लागणारा प्रचंड खर्च कमी व्हावा तसेच वित्तीय तूट भरून काढण्यास हातभार लागावा अशा अनेक उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजतगाजत आणलेल्या गोल्ड मोनेटायझिग स्कीमला सध्या तरी थंडा प्रतिसाद असल्याचे दिसत असले तरी मोदींच्या या योजनेला जगातील प्रसिद्ध देवस्थानात गणना होत असलेल्या तिरूमलाच्या तिरूपती बालाजीचा वरदहस्त लाभणार असल्याचे समजते.

या योजनेत सरकारने नागरिकांनी तसेच मंदिर संस्थानी त्यांच्याकडे बेकार पडून असलेले सोने बँकेत ठेवावे व त्याबदल्यात व्याज घ्यावे अशी सोय दिली आहे. ही योजना जाहीर झाल्यापांसून आत्तापर्यंत फक्त कांही किलो सोनेच जमा झाले आहे. मात्र तिरूपती देवस्थान त्यांच्याकडील सुमारे साडेपाच टन सोने या योजनेत ठेवण्याबाबत गंभीरपणे विचार करत असून येत्या १० ते १५ दिवसांत या संदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

तिरूपती देवस्थान ट्रस्टकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार बालाजीला दरवर्षी देशविदेशातून येणारे भाविक सोने, दागिने स्वरूपात मोठे दान करतात. दरवर्षी कित्येक किलो सोने येथे जमा होते. यापूर्वीही हे सोने बँकांकडे ठेवले गेले आहे व त्यावर बँका १ टक्का व्याजही देत आहेत. सरकारच्या नवीन योजनेचा अभ्यास केला जात असून त्यात जमा सोन्यावर अडीच टक्के व्याज दिले जाणार आहे. त्यामुळे तिरूपती मंदिरात जमा होत असलेले सोने या योजनेत गुंतविण्याचा विचार सुरू आहे.

Leave a Comment