डबाबंद खाद्यपदार्थांची गुणवत्ता ओळखणारे फूड स्विच अॅप भारतात

food-switch
भलेथोरले पैसे खर्चून आणि डब्यांवर लिहिलेल्या मजकुरावर विश्वास ठेवून आपण बिनधास्त डबाबंद खाद्यपदार्थ खरेदी करतो. मात्र त्यावर दिलेली माहिती वा अन्नघटक खरोखरच आरोग्यासाठी उपयुक्त आहेत का हे डबा फोडेपर्यंत समजू शकत नाही. नागरिकांची ही गैरसोय दूर व्हावी आणि आरोग्यदायी, पौष्टिक पदार्थच त्यांना मिळावेत यासाठी बाहेरूनच ही माहिती सहज समजू शकेल असे फूड स्विच नावाचे मोबाईल अॅप भारतात दाखल झाले आहे. ऑस्ट्रेलिया, युके, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत ते यापूर्वीच उपलब्ध झाले आहे.

जॉर्ज इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ यांनी बाजारात आणलेले हे अॅप प्रो. बसनील यांनी तयार केले आहे. मोबाईल व टॅब्लेटवर ते मोफत डाऊनलोड करून घेता येणार आहे. या अॅपच्या सहाय्याने फूडपॅकेट स्कॅन करताच आतील पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक आहेत का, योग्य आहेत का अथवा संशयास्पद आहेत का याची माहिती लाल, हिरवा व पिवळ्या रंगाच्या सिग्नलने मिळणार आहे. लाल सिग्नल हा धोकादायक पदार्थ असे सुचवेल, हिरवा पदार्थ आरोग्यासाठी योग्य असल्याचे व तर पिवळा सावधान, नक्की सांगता येत नाही असे सुचवेल.

भारतातील १० हजार पॅकबंद उत्पादने या अॅपवर तपासून पाहता येणार आहेत. त्याचे विश्लेषण करण्यासाठी सेंटर फॉर क्रानिक डिसिज कंट्रोल संस्थेची मदत घेतली गेली आहे. अॅपसाठी पदार्थांची घेतलेल्या माहितीचे आकडे बहुतेक सर्व देशांत सर्वसामान्य लोकांकडूनच गोळा केले गेले आहेत असे निर्माते प्रो. बसनील यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment