याहू विकू शकतो इंटरनेट बिझनेस !

yahoo
न्युयॉर्क – इंटरनेट बिझनेस विकण्यावर याहू कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत भर देण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. दरम्यान याहूच्या सीईओ मरिसा मेयर यांचेही भवितव्य धोक्यात असल्याचे सांगितले जात आहे.

याहूच्या संचालक मंडळाची या आठवड्यात मरिसा मेयर आणि कंपनीच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. यासंदर्भात पहिल्यांदा बातमी देताना वॉल स्ट्रिट जर्नलने म्हटले होते, की याहू इंटरनेट बिझनेस विकण्याच्या विचारात असून यावेळी अलिबाबा होल्डिंग ग्रुप लिमिटेडमधील तब्बल ३० बिलियन अमेरिकी डॉलर किमतीचे शेअर्सही विकण्यावर चर्चा झाल्याचे समजते. कंपनीकडून दोन्ही पर्यायांवर गांभीर्याने विचार करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पण याहू कंपनीने याबाबत अधिकृत माहिती देण्यास मात्र नकार दिला आहे. याहू मेल, न्युज आणि स्पोर्ट्स साईट्स सध्या याहूच्या कोर इंटरनेट बिझनेसमध्ये येतात.

मरिसा मेयर गुगल सोडून याहूत दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याकडून खुप अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मोबाईल, व्हिडिओ, नेटिव्ह आणि सोशल मीडिया अॅड्सवर याहूने भर दिला होता. पण त्यामुळे याहूच्या उत्पन्नात अपेक्षित भर पडली नाही. या पार्श्वभूमिवर याहूच्या संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.

Leave a Comment