शिवसेनेची सत्पात्री मदत

shivsena
शिवसनेच्या नेत्यांनी दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरवले आणि दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत करण्याचे विधायक पाऊल टाकले. त्यामागची दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांविषयी असलेली तळमळ प्रमाणिकपणाची आहे. तशी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनीही शेतकर्‍यांना मदत करायला सुरूवात केली आहे. चित्रपट अभिनेता अक्षयकुमार यांनीही प्रचंड मोठी मदत केलेली आहे. या सर्वांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. मात्र अशी मदत करताना थोडा विचार आणि अभ्यास करण्याची गरज असते. शिवसेनेच्या मदतीमध्ये असा अभ्यास केला असल्याचे जाणवले. कारण शिवसेनेचा भर शेतकर्‍यांना निव्वळ काही रक्कम नेऊन देण्यावर नाही.

शिवसेनेने मदत करताना दोन गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. संकटग्रस्त शेतकर्‍यांपैकी बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी झालेले असतात. कर्जबाजारीपणाची दोन मुख्य कारणे असतात. पहिले आजारपण आणि दुसरे लग्न. लग्नाचा बार उडवून देण्याच्या भावनेत शेतकरी बर्‍याच अंशी कर्जबाजारी होत असतात ही वस्तुस्थिती आहे. म्हणून शिवसेनेने मदत करताना शेतकर्‍यांच्या मुलींचे विवाह सामूहिक विवाहात लावून देण्याबाबत पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. सामूहिक विवाहाच्या माध्यमातून अनेक शेतकर्‍यांवरील संकट टळू शकते. ही वस्तुस्थिती आहे. कर्जबाजारी होऊन मुलींची लग्ने करण्यापेक्षा ती लग्ने सामूहिक विवाहात केली तर त्यांचा बराच खर्च वाचतो.

शेतकर्‍यांना मदत करताना ती निव्वळ परोपकाराच्या भावनेतून आणि एक रकमी न करता शेतकर्‍यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले पाहिजे. सध्या तरी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना वाईट अवस्थेतून तोंड वर काढण्यास शेळीपालन हा व्यवसाय मोठा उपयुक्त ठरणार आहे. म्हणून शिवसेनेने शेतकर्‍यांना मदत देताना काही पैशासोबत दोन शेळ्या देण्यास सुरूवात केली आहे. हे पाऊल अतीशय विधायक स्वरूपाचे आहे. कारण एक शेळी चौदा महिन्यात दोन वेळा विते आणि चार पिलांना जन्म देऊ शकते. तिच्यावर फारसा खर्चही करावा लागत नाही. तेव्हा शिवसेनेने ज्या कुटुंबांना शेळ्या दिलेल्या आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती वर्षभरात बर्‍यापैकी सुधारल्याचे दिसून आल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांना शेतीची माहिती नसते अशी टीका शरद पवार नेहमीच करत असतात परंतु या शेळी वाटपातून तरी हे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment