जगातील सर्वात अरूंद इमारत

canada
आपल्या रूंदीमुळे गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदली गेलेली जगातील सर्वात अरूंद व्यावसायिक इमारत पाहायची असेल तर कॅनडातील व्हँक्यूव्हर मधील ८, वेस्ट पेडर स्ट्रीटला भेट देणे भाग आहे. सॅम बिल्डींग या नावाने प्रसिद्ध असलेली ही तीमजली इमारत १९१३ साली बांधली गेली असून ती फक्त सहा फूट रूंद आहे.

यामागचा इतिहासही मोठा मनोरंजक आहे. ही इमारत चेंग तॉय याच्या मालकीची. हा चीनी १८७४ सालात कॅनडात मजूर म्हणून आला. त्यानंतरही त्याने अनेक प्रकारची कामे करून स्वतःची मर्चंट फर्म काढली. त्या काळची ती मोठी मर्चंट फर्म ठरली. चेंग अतिश्रीमंत झाला आणि त्याने अनेक मालमत्ता खरेदी केल्या. त्यातच १९०२ साली त्याने प्लॉट खरेदी केला. मात्र कालांतराने तो शहर विकास समितीने रस्तारूंदीसाठी ताब्यात घेऊन या प्लॉटचा मोठा भाग ताब्यात घेतला. त्यापायी चेंगला नुकसानभरपाई दिली पण ती पुरेशी नव्हती. म्हणून चेंगने या जागेत ही ३ मजली इमारत बांधली.

चायना टाऊन विभागात आजही उभी असलेली ही इमारत पूर्णपणे व्यावसायिक आहे. युरोपिय समुदायात चेंगचे नामकरण सॅम असे झाले व त्यामुळे ही इमारतही सॅम बिल्डींग म्हणून ओळखली जाते. आत्तापर्यंत दोन वेळा म्हणजे एकदा १९६६ मध्ये तर दुसर्‍यांदा १९८६ मध्ये तिची दुरूस्ती केली गेली. दोन वर्षांपूर्वी या इमारतीने तिची शंभरी गाठली व त्यानिमित्ताने आता तिचे रिनोव्हेशन सुरू आहे.

ब्रायन गिलम हा या इमारतीचा शिल्पकार. या इमारतीवर जंक चो इन्शुरन्स कंपनीची निओन साईन पाटी आहे. १९८६ सालातील ही पाटी म्हणजे येथील चायना टाऊन मधली पहिली निओन साईन आहे.

Leave a Comment