नीलहरित शैवालापासून विद्युत ऊर्जानिर्मिती

mutthukumaran
टोरांटो : नीलहरित शैवालापासून विद्युत ऊर्जा निर्माण करणारे तंत्रज्ञान शोधण्यात आले असून त्यामुळे आगामी काळात सेलफोन व संगणकांनाही विद्युत पुरवठा करता येईल. एका भारतीय वैज्ञानिकाचाही हे संशोधन करणा-यात समावेश आहे.

काँकॉड्रीया अभियांत्रिकी विद्यापीठातील प्रा. मुथुकुमारन पाकिरीसामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संशोधनानुसार नीलहरित शैवाल ज्या पद्धतीने प्रकाशसंश्लेषण करतात त्यातून विद्युत ऊर्जा तयार करता येते. प्रकाश संश्लेषण व वनस्पतींचे कार्बन वायू घेणे यातून इलेक्ट्रोनचे स्थानांतरण होत असते. पाकिरीसामी यांच्या मते, या दोन्ही क्रियांमध्ये नैसर्गिक रीत्या विद्युत ऊर्जा तयार होते. सायनोबॅक्टेरिया या नीलहरित शैवालाचा यात वापर करता येतो. पृथ्वीवरील जैविक घटकांपैकी हे एक शैवाल आहे. सर्व उंचीवरील पृष्ठभागावर हे शैवाल आढऴून येते. ते शैवाल नष्ट होणारे नाही. या सूक्ष्म जिवांमुळेच पूर्वीच्या काळी ऑक्सिजनची निर्मिती झाली, त्यातून प्रगत जीव पुढे तयार झाले. जगात सतत चालू असलेल्या या नैसर्गिक प्रक्रियेतून आपल्याला कार्बनमुक्त ऊर्जा तयार करता येते. हे संशोधन अजून बाल्यावस्थेत असल्याचे पाकिरसामी यांचे मत आहे. विद्युत घट तयार करण्यासाठी व त्यांच्या व्यावसायिक वापरासाठी अजून बराच काळ लागेल. सध्या फॉस्फोसिंथेटिक सेल (विद्युत घट) लहान आकारात अस्तित्वात आहेत. त्यात कॅथोड व अ‍ॅनोड असतो तसेच प्रोटॉनची देवाणघेवाण होऊ शकेल, असे अर्धपार पटलही असते. सायनोबॅक्टेरिया किंवा नीलहरित शैवाल ही अ‍ॅनोड कक्षात ठेवली जातात. प्रकाशसंश्लेषणात सायनोबॅक्टेरिया हे इलेक्ट्रोन इलेक्ट्रोडच्या पृष्ठभागावर सोडतात. बाह्य विद्युत भार हा संयंत्राला जोडलेला असल्याने इलेक्ट्रोन बाहेर काढून विद्युत ऊर्जा मिळविता येते. ब-याच संशोधनानंतर हे तंत्रज्ञान संगणक व सेलफोनला विद्युत पुरवठा करण्यासाठी वापरता येईल, त्यात सूक्ष्म फोटोसिंथेटिक विद्युत घटांच्या मदतीने वीजपुरवठा शक्य आहे. ‘टेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Comment