एचएसबीसी बँक भारतातून गाशा गुंडाळणार

hsbc
मुंबई: ‘एचएसबीसी’ने भारतातील खाजगी बँकिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या निधी व्यवस्थापन आणि इतर आर्थिक व्यवसायांच्या सुलभीकरण आणि वृद्धीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘एचएसबीसी’च्या भारतातील प्रवक्त्याने सांगितले.

विदेशी बँकांच्या कार्यपद्धती आणि व्यवसायाचा धोरणात्मक अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढील धोरण निश्चित होईपर्यंत आगामी काळातील प्रगती आणि व्यवसाय वाढीतील सातत्य याबाबत दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यात येणार असून त्याची निश्चिती होईपर्यंत भारतातील बँकिंग सेवा बंद राहील; असे बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

बँकेच्या ग्राहकांना ‘एचएसबीसी प्रिमिअर’ या जागतिक वित्तसेवेद्वारे सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही प्रक्रीया सन २०१६ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत पूर्ण करण्यात येईल. एचएसबीसी बँकेचे भारतात ७० तज्ज्ञ अधिकारी आणि ३२ हजार कर्मचारी कोर्पोरेट, रिटेल आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेवा देत आहेत. या कर्मचाऱ्यांचे भवितव्य या निर्णयाने अधांतरी लटकले आहे.

मागील काही वर्षापासून भारतीय अर्थव्यवस्था बाळसे धरीत असताना या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याच्या उद्देशाने अनेक विदेशी बँका आणि वित्त व्यवस्थापन संस्थांनी भारतात आपली दुकाने थाटली आहेत. आपल्या आक्रमक जाहिरातबाजी आणि विपणन यंत्रणेद्वारे त्यांनी ग्राहकांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करीत असूनसुद्धा या बँकांना मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढविण्यात यश आले नाही.
मागील काही काळात रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड, मॉर्गन स्टेनले यासारख्या दिग्गज संस्थांनी जागतिक व्यवसायाची पुनर्रचना करण्याच्या नावाखाली भारतातील आपले बँकिंग व्यवसाय गुंडाळले आहेत.

Leave a Comment