कैलास मानसरोवरसाठी चारपदरी रस्ता

kailash
हिदूंसाठी पवित्र कैलास मानसरोवर यात्रा आता कमी वेळात आणि कमी खर्चात करण्याचा मार्ग खुला होत आहे. उत्तराखंड राज्यातून कैलासला जाणारा पारंपारिक रस्ता चार पदरी करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. येत्या दोन वर्षात हा मार्ग यात्रेकरूंसाठी खुला होईल असे केंद्रीय रस्ते निर्माण व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले लिपूलेख दरीपर्यंत हा रस्ता चारपदरी केला जात आहे. त्यासाठी पहाड फोडावे लागत आहेत. हा रस्ता चीनसीमेपर्यंत जाईल. तेथून मानसरोवर ७२ किमी वर आहे. मात्र चीन सरकारने मानसरोवर पर्यंतचा रस्ता अगोदरच तयार केलेला आहे. यामुळे कैलासाचे दर्शन व मानसरोवरची पूजा करणारे यात्रेकरू एक दिवसात परतू शकतील मात्र ज्यांना कैलास प्रदक्षिणा करायची आहे त्यांना एक रात्र मुक्काम टाकावा लागेल. सिक्कीमच्या नथुला खिंडीतून असाच एक रस्ता तयार केला गेला आहे.

या रस्त्याचे काम बॉर्डर रोड ऑरगनायझेशनकडे आहे. रस्त्याच्या कामासाठी ऑस्ट्रेलियातून विशेष मशिनरी मागविली गेली आहे. आत्तापर्यंत ३७ किमी पहाड फोडला गेला आहे. या रस्त्यावर जागोजागी यात्रेकरूंसाठी विश्रांतीस्थाने उभारली जाणार आहेत. सध्या या यात्रेसाठी भाविकांना किमान दीड लाख रूपये खर्च येतो. नवीन रस्त्यामुळे हा खर्च व वेळ दोन्ही वाचू शकणार आहे. तसेच कुमाऊं भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे आणि चीन बरोबरच्या व्यापारासाठीही त्याचा उपयोग होणार आहे.

Leave a Comment