दिवसात दोन वेळा समुद्रात बुडणारे मंदिर

stambhesh
हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत असे मानले जाते मात्र देवांचे देव म्हणून महादेवाची पूजा केली जाते. भारतभर महादेवाची अक्षरशः हजारो मंदिरे आहेत. मात्र गुजराथमधील हे महादेव मंदिर अनोखे आहे. बडोद्यापासून ८५ किमी अंतरावर असलेल्या कावी कंबोई गावात हे मंदिर आहे. स्तंभेश्वर नावाच्या या मंदिराचे वेगळेपण म्हणजे सकाळी आणि सायंकाळी कांही काळापुरते ते दिसेनासे होते. ही कमाल आहे समुद्राच्या ओहोटी भरतीची. अरबी समुद्रात हे मंदिर आहे.

ओहोटीच्या वेळी हे मंदिर जमिनीवर दिसते आणि भाविक शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतात. भरतीच्या वेळी मात्र मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते. आहोटीच्या वेळी समुद्राच्या सुंदर पार्श्वभूमीवर हे मंदिर फारच देखणे दिसते. येथे येणार्‍या भाविकांना भरती आहोटीच्या वेळा छापलेली पत्रके दिली जातात. शेकडो वर्षांपूर्वीच्या या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराचे उल्लेख श्री महाशिवपुराणात आहेत. मंदिराचा शोध १५० वर्षांपूर्वी लागला. मंदिरात ४ फूट उंचीचे आणि २ फूट व्यासाचे शिवलिंग आहे.

राक्षस ताडकासूराने शंकाराला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वरदान मिळविले. ते असे की त्याला शंकराच्या सहा दिवसांच्या मुलाकडूनच मृत्यू यावा. शंकराने हे वरदान दिले मात्र ताडकासूरने हाहाकार माजविल. देवांना त्याने हैराण करून सोडले. अखेर देव मदतीसाठी महादेवाकडे आले. तेव्हा श्वेत पर्वताच्या कुंडात महादेवाने सहा डोकी, चार डोळे आणि १२ हात असलेल्या बालकाला उत्पन्न केले. हा कार्तिकेय म्हणजे शंकराचा पुत्र. त्याने ताडकासुराचा वध केला. पण त्याला जेव्हा ताडकासूर शंकराचा भक्त होता असे कळले तेव्हा तो दुःखी झाला. शेवटी विष्णुने त्याला वध केल्या जागी महादेव मंदिर बांधण्याचा सल्ला दिला व तेच हे मंदिर आहे असे सांगितले जाते.

Leave a Comment