कन्येच्या लग्नासाठी ५५ कोटींचा खर्च !

ravi-pillai
तिरुवअनंतपुरम : केरळचे एनआरआय उद्योगपती रवी पिल्लई यांची कन्या आरती हिचा विवाह राजेशाही थाटात पार पडला. तब्बल ५५ कोटी रुपये या सोहळ्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. केवळ सभामंडपच राजमहालासारखा उभारण्यात आला होता. याबरोबरच कुठलीही उणीव भासणार नाही, याची काळजी अगोदरपासूनच घेण्यात आली होती. केरळची राजधानी तिरुवअनंतपुरम येथील कोलम आश्रमातील ८ एकर जागेत हा सोहळा पार पडला. सर्वत्र हा एकच चर्चेचा विषय होता.

रवी पिल्लई हे केरळमधील पहिल्या क्रमांकाचे अब्जाधीश आहेत. आखाती देशांत पिल्लई यांच्या आरपी समूहाचा मोठा दबदबा आहे. या समूहाचे बांधकाम, पायाभूत विकास, खाणकाम आणि शिक्षण क्षेत्रात वर्चस्व आहे. आरपी समूहाच्या एकूण २६ कंपन्या आणि ८० हजार कर्मचारी आहेत आणि त्यांच्या या उद्योग समूहाची उलाढाल तब्बल १४ हजार कोटींवर आहे.

कन्या डॉ. आरती हिचा विवाह कोचीमधील डॉ. आदित्य विष्णू यांच्याशी झाला. या लग्नाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. तिरुवअनंतपुरम येथे आठ एकर जमिनीवर या लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी २० कोटींचा खर्च आला. तसेच कला दिग्दर्शक साबू सिरील यांच्या मार्गदर्शनाखाली २०० प्रोफेशनल्सच्या मदतीने लग्नाचा सभा मंडप उभारल. राजस्थानी शैलीनुसार एका राजमहालाप्रमाणे हा मंडप उभारण्यात आला. सिरील यांनीच बाहुबली चित्रपटाचा सेट उभारला होता. लग्न मंडप ८ एकर जमिनीपैकी ४० हजार स्क्वेअर फूट जागेवर उभारला गेला, असे सांगण्यात आले. बाहुबलीचा सेट उभारण्यासाठी सिरील यांना अडीच वर्ष लागली होती. पण या लग्नाचा मंडप त्यांनी ७५ दिवसांत पूर्ण केला. या लग्न सोहळ्यासाठी युरोप आणि आखाती देशांतून ४२ पाहुणे लग्नासाठी आले.

यात ब-याच देशांच्या प्रतिनिधी म्हणजेच सरकारी अधिकारी, कंपन्यांचे सीईओ, राजकीय नेते, अभिनेते, आयटी तज्ज्ञ आणि डिप्लोमॅटस् यांचा समावेश होता. या पाहुण्यांसाठी दोन विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी देश-विदेशातील हायप्रोफाईल मंडळी आल्याने लग्न सोहळ्यात सुरक्षेचीही विशेष काळजी घेण्यात आली. त्या पाश्र्वभूमीवर २५० पोलिस आणि ३५० खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते.

लग्नातील सर्व कार्यक्रम आणि सभा मंडपाची जबाबदारी बाहुबली चित्रपटाच्या निर्मात्याकडे देण्यात आली होती. लग्न सोहळ्यात खास संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमात संगीतकार स्टीफन देवसी यांच्या संगीतावर मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री मंजू वरिअर आणि शोभना यांचे नृत्य झाले. तब्बल ३० हजार पाहुण्यांसमोर हा नृत्य आणि संगीताचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे पाहुण्यांच्या व्यवस्थेसाठी ३ लाख, ५० हजार स्क्वेअर फूटवर राजस्थानी राजेशाही महाल उभारण्यात आला.

Leave a Comment