१८० पक्षांच्या प्रजाती धोक्यात!

iucn
नवी दिल्ली : १८० पक्ष्यांच्या प्रजाती देशभरात धोक्यात आल्या असून, यात नव्याने आठ प्रजाती धोक्यात आल्या आहेत. २०१५ ची लाल यादी (रेड लिस्ट) पक्षी संवर्धन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संस्था (आययूसीएन)ने जाहीर केली असून, यावरून ही बाब उघड झाली आहे. अशाश्वत विकास उपक्रमांमुळे पक्षांच्या या प्रजातींना धोका निर्माण झाल्याचा संस्थेचा निष्कर्ष आहे.

आठपैकी पाच प्रजाती कमी धोकादायक गटात आहेत. यामध्ये नॉर्दन लॅप्विंग, रेडनॉट, क्युले सँडपायपर, युरोशियन ऑस्टेरकॅचर आणि बारटेल्ड गॉडवीट या पक्ष्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी १७३ पक्ष्यांचा यादीत समावेश होता. गवताळ आणि पाणथळ प्रदेशातील पक्ष्यांचा यात समावेश असल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्टड्ढी सोसायटी आणि बर्ड लाईफ इंटरनॅशनल व इतर सहभागी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. संकटग्रस्त पक्ष्यांच्या प्रजातीत हॉर्न ग्रेब आणि कॉमन पोचार्ड या दोन पाणथळ पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश असून, स्टेप इगल हा भारतीय उपखंडातील पक्षीही या गटात आहे. यामुळे पक्षीप्रेमींमध्ये निराशा पसरली असली, तरी त्यातल्या त्यात युरोपियन रोलर हा लाल यादीतील धोकादायक पक्षी यातून बाहेर पडला आहे, ही एक समाधानाची बाब आहे. गवताळ, पाणथळ आणि जंगल प्रदेशातील पक्ष्यांचे अस्तित्व अशाश्वत विकास उपक्रमामुळे धोक्यात आले असल्याचा निष्कर्षही आययूसीएनने काढला आहे. यामुळे लाल यादीतील पक्ष्यांच्या संरक्षणाच्या आणि संवर्धनाच्या दृष्टीने अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांच्या संरक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता यामुळे निर्माण झाली आहे.

Leave a Comment