लग्नाला आले चतुष्पाद वर्‍हाडी

jenet
लग्न म्हटले की वरहाड आलेच. लग्नाच्या पाहुण्यांची यादी कितीतरी अगोदरपासून करावी लागते हा तर सर्वांचाच अनुभव. तरीही कुणीतरी महत्त्वाचे बोलवायचे राहून जाते आणि मग रूसवाफुगव्याचा एखादा अंकही सादर केला जातो. आयुष्यात एकदाच करावयाचा समारंभ अशी लग्नाची ओळख आता पुसली गेली असली तरी पहिल्यांदाच लग्नाच्या मांडवात उतरताना आपले लग्न संस्मरणीय आणि थोडे हटके असावे अशी बर्‍याच जणांची इच्छा असते.

इंग्लंडच्या वार्कशायर भागात राहणार्‍या पॉल फ्रिक्ली आणि जेनेट स्टील यांचीही अशीच इच्छा होती. म्हणून त्यांनी त्यांच्या लग्नाला नातेवाईकांसह विविध प्रकारचे ३० प्राणीही बोलावले आणि या प्राण्यांनी लग्नाला उपस्थित राहून पाहुण्यांचेही कौतुक मिळविले. या चतुष्पाद प्राण्यात मांजरे, कुत्री होतीच पण घुबड, विंचू, अजगर असे अनोखे पाहुणेही होते. लग्नाला आलेल्या नातेवाईकांनी या प्राण्यांसोबत फोटोही काढून घेतले. म्हणजे आता लग्नाच्या अल्बममध्येही हे पाहुणे झळकणार.

इंग्लंडमधील द पार्टी एनिमल्स नावाची कंपनी असे प्राणी पार्टीत उपलब्ध करून देते. या प्राण्यांच्या दोन तासांच्या उपस्थितीसाठी तब्बल १० हजार रूपये चार्ज आकारला जातो.

Leave a Comment