बलाढ्य अमेरिकेची राजधानी म्हणून ओळखीचे असलेले शहर वॉशिंग्टन येथील स्मारके आणि संग्रहालयांसाठीही आवर्जून भेट द्यावे असे शहर आहे.
वॉशिंग्टन – स्मारके आणि संग्रहालयांचे शहर
राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेला व्हाईट हाऊसचा परिसर आणि येथील प्रत्येक इमारत खास म्हणावी अशी आहे आणि विशेष म्हणजे आपल्या दिल्लीतल्या जंतरमंतर प्रमाणे येथेही सतत कोणती ना कोणती निदर्शने सुरू असतात. तसेच वॉशिंग्टनला भेट देणारा कुणीही प्रवासी व्हाईट हाऊसचे दर्शन घेतल्याशिवाय परतत नाही अशीही याची ख्याती आहे. नॅशनल मॉल एरियातील लिंकन मेमोरियलही असेच भुरळ घालते. हे महाप्रचंड मेमोरियल अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या स्मरणार्थ उभारले गेले आहे. ३६ स्तंभांची ३ भागात वाटलेली ही इमारत त्याकाळच्या अमेरिकेच्या ३६ राज्यांचे प्रतिनिधित्व करते. मात्र नंतर अमेरिकेतील राज्यांची संख्या ४२ वर गेल्याने या स्तंभांवर ४२ स्टोन बसविले गेले आहेत. गंभीर मुद्रेतली लिंकन यांची १९ फुटी भव्य मूर्ती हे आणखी एक आकर्षण.
एअर अॅन्ड स्पेस म्युझियममध्ये आतापर्यंतच्या सर्व अंतराळ यानांचा विकास कसा झाला याची माहिती संग्रहीत आहे. शिवाय येथे चंद्राचा एक तुकडाही आहे आणि त्याला कुणीही स्पर्श करू शकतो. म्हणजे चंद्राला स्पर्श करण्याची संधी येथे आहे. व्हिंएतनाम मेमोरियल भावनाविवश करते कारण अमेरिकेच्या इतिहासातील हा काळा अध्याय आहे. त्यामुळेच येथे यूद्धात शहीद झालेल्या जवानांनी नावे काळ्या दगडात कोरली गेली आहेत. थ्री सर्व्हीसमन असे तीन सैनिकांचे पुतळे असलेले एक स्मारक येथे आहे तसेच या युद्धात नर्स म्हणून कामगिरी बजावलेल्या माहिलांसाठीचे एक दालनही आहे.