१.३५ लाख कोटींची म्युच्युअल फंडांत गुंतवणूक

mutual-fund
नवी दिल्ली- विविध योजनांच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये १.३५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून यात सर्वाधिक योगदान लिक्विड श्रेणीचे राहिले आहे. याबरोबरच देशातील प्रमुख ४३ फंड हाऊसेसच्या मालमत्तेचा स्तर या महिन्यात १३.२४ लाख कोटी रुपये या सार्वकालिक उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये हा स्तर ११.८७ लाख कोटी रुपये एवढा होता.

म्युच्युअल फंडांतून सप्टेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी ७७ हजार कोटी रुपये काढून घेतले होते. मार्चनंतरची म्युच्युअल फंडाबाहेर गेलेली ही सर्वाधिक गुंतवणूक ठरली होती. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यातील कामगिरी समाधानकारक ठरली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अ‍ॅम्फी)च्या आकडेवारीनुसार, गेल्या महिनाभरात गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड योजनांमध्ये १,३४,५६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत मुच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ २.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत म्युच्युअल फंडांतून गुंतवणूकदारांनी १.५५ लाख कोटी रुपये काढून घेतले होते.

म्युच्युअल फंडाच्या ताज्या गुंतवणुकीत लिक्विड फंड आणि मनी मार्केट फंडांमधील गुंतवणुकीचा सर्वाधिक ओघ राहिला आहे. दुसरीकडे इक्विटी योजनांवर गुंतवणूकदारांनी विश्वास कायम ठेवला आहे. लिक्विड फंडामध्ये गेल्या महिन्यात १.०३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. उत्पन्न फंडांमध्ये २२,८७५ कोटी रुपयांचा ओघ राहिला. तर इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित योजनांमध्ये ६,२६९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

लिक्विडिटी आणि मनी मार्केट फंड प्रामुख्याने कमर्शिअल पेपर्स, ट्रेझरी बिल्स, मुदत ठेवी आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट यांसारख्या माध्यमात गुंतवणूक करतात. या फंडाचा गुंतवणूक कालावधी कमी असतो. तसेच लॉक-इन पिरियडची अटही नसते.

Leave a Comment