भाविकांना कर्ज देणारे देव

temple
सिमला- देवभूमी अशी ओळख असलेल्या निसर्गसंपन्न हिमाचल प्रदेशात अनेक मंदिरे आहेत. भाविक देवळात देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रामुख्याने जातात हे खरे असले तरी या देवभूमीत अशीही कांही मंदिरे आहेत की या मंदिरातील देव भाविकांना गरजेनुसार कर्ज देऊन त्यांची अडचण दूर करतात. शेवटी भाविकांच्या मदतीसाठी धावणार नाही तो देव कसला, नाही का?

हिमाचल प्रदेशातील राजधानी सिमला, सरमौर, किन्नोर, लाहोलस्पिती या भागातील कांही मंदिरातून भाविकांना गरजेनुसार कर्ज दिले जाते. ही परंपरा खूप जुनी आहे. हे कर्ज १ वर्षांसाठी दिले जाते व त्यासाठी दोन किवा तीन टक्के व्याजही आकारले जाते. मात्र कर्ज फेडेपर्यंत गरजूची परिस्थिती सुधारली नसेल तर हे कर्ज माफ केले जाते.

मंदिर व्यवस्थापनांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्ज ज्याला द्यायचे तो खरोखरच गरजवंत आहे का हे पाहिले जाते. कर्ज परतफेड होईल का नाही याची चिंता केली जात नाही कारण शेवटी हा श्रद्धेचा प्रश्न आहे. आपल्या देवाला कुणीच फसवणार नाही अशी येथे श्रद्धा आहे. कर्ज देताना रोख रक्कम अथवा धान्य अशा दोन्ही प्रकारात दिले जाते. रोख कर्जाची फेड रोखीनेच करावी लागते व धान्य कर्जाची फेड धान्यानेच करावी लागते.

Leave a Comment