प्राप्तीकर खात्याचे नवे मोबाईल अ‍ॅप

income-tax
नवी दिल्ली : कुठलीही समस्या आणि अडचणींशिवाय आपल्या करदात्यांना प्राप्तीकर विवरण भरणे शक्य व्हावे, यासाठी प्राप्तीकर खात्याने मोबाईल अ‍ॅप तयार करण्याच्या दिशेने पुढाकार घेतला असून प्राप्तीकराचा भरणा करण्याची पद्धत या अ‍ॅपमुळे आणखी सोयीस्कर होणार असल्याची माहिती अर्थमंत्रालयाच्या एका अधिका-याने दिली आहे.

एक मोबाईल अ‍ॅप प्राप्तीकर खाते तयार करीत असल्यामुळे करदात्यांना घरबसल्याच आपल्या मोबाईलवरून प्राप्तीकराचा भरणा करणे शक्य होणार आहे. सुरक्षिततेशी संबंधित काही मुद्यांची पडताळणी करणे सुरू आहे. सुरक्षेबाबत काही समस्यांचे निराकरण झाल्यानंतर ही मोबाईल अ‍ॅप सेवा करदात्यांना उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अध्यक्ष अनिता कपूर यांनी ३५ व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात बोलताना दिली.

कपूर यांनी प्रत्यक्ष कर भरणा संदर्भात म्हटले की, कर भरणा चांगला होत आहे आणि आम्हाला आशा आहे की, कर भरणा संबंधीचा नवा मोबाईल अ‍ॅपमुळे आयकर रिटर्न भरणा-या करदात्यांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. येत्या डिसेंबर महिन्यात यासंदर्भात खरा परिणाम पाहायला मिळेल. आयकर कायदा सुलभ बनविण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर.व्ही. ईश्वर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समिती पुढील वर्षी जानेवारीमध्ये आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीकडे अहवाल सादर करण्यासाठी भरपूर कालावधी आहे.

केंद्र सरकारने यावर्षी आधार क्रमांक, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम यासारख्या सेवांचा वापर करून ऑनलाईन पडताळणी सुविधा उपलब्ध केली होती. त्यामुळे ऑनलाईन प्राप्तीकर भरणा-यांची संख्या वाढली आहे. यंदा ई-फायलिंगच्या शेवटच्या दिवशी तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त विवरणपत्रे अपलोड करण्यात आली होती. यामुळे सीबीडीटीने ई-फायलिंगच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत, असे त्यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षात सरकारने ७.९८ लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. प्राप्तीकर कायदे आणि नियम अधिक सोपे आणि सुलभ करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. व्ही. ईश्वर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा पहिला अहवाल पुढील वर्षी जानेवारीत अपेक्षित आहे, असेही कपूर यांनी सांगितले.

Leave a Comment