महागाईचा आगडोंब

clean-india
नवी दिल्ली : रविवारपासून १४ टक्के सेवाकरासोबत अतिरिक्त ०.५ टक्का स्वच्छ भारत अधिभार लागू करण्यात आल्याने उच्च श्रेणीचा रेल्वे प्रवास महागला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार प्रथम श्रेणी आणि सर्व एसी श्रेणीचे रेल्वेभाडे १५ नोव्हेंबरपासून ४.३५ टक्क्यांनी वाढले आहे. या शिवाय हा नवा कर लागू झाल्याने हॉटेलमध्ये जेवण, मोबाईल, रेल्वे प्रवास, विमान प्रवास, कोचिंग, बँकिंग, परिवहन, गृहनिर्माण, जाहिरातींसह १२० सेवा महागल्या असून जनतेच्या खिशाला याची झळ बसणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत काही सेवांवर रविवारपासून अर्धा टक्का अधिभार लागू झाला असल्याने, मोठ्या हॉटेलात जेवण घेणे, टेलिफोन/मोबाईलवर बोलणे आणि रेल्वेतील वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे महाग झाले आहे. या अधिभारामुळे चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात केंद्र सरकारच्या तिजोरीत किमान ३८०० कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

आतापर्यंत सेवा कर १४ इक्के इतका होता. त्यात आता अध्र्या टक्क्याची भर पडल्याने तो १४.५ टक्के झाला आहे. महसूल सचिव हसमुख अधिया यांच्या मते, स्वच्छ भारत अधिभारातून चालू आर्थिक वर्षात सरकारला ३८०० कोटी आणि त्यापुढील संपूर्ण आर्थिक वर्षात किमान दहा हजार कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे. या करातून मिळणारा महसूल केवळ देशात स्वच्छता मोहीम आणखी प्रभावीपणे राबविण्यासाठीच करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने गेल्या ६ नोव्हेंबर रोजी अर्धा टक्का स्वच्छ भारत अधिभार आकारणारी अधिसूचना जारी केली होती. त्याची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे. मोठ्या हॉटेलातील जेवणाच्या बिलावर आतापर्यंत ५.६ टक्के सेवा कर आकारण्यात येत होता. तो आता ५.८ टक्के झाला आहे. तथापि, १५ नोव्हेंबरपूर्वीच्या कोणत्याही बिलावर हा कर आकारला जाणार नाही. महागड्या हॉटेलात जेवण घेण्यासोबत अन्य करयोग्य सेवेत येणा-या टेलिफोन आणि रेल्वेच्या वातानुकूलित प्रवासावरही हा अर्धा टक्का अधिभार आकारला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सेवा करात वाढ झाल्यामुळे रेल्वेच्या सर्वसाधारण आणि शयनयान श्रेणीच्या प्रवास भाड्यावर अधिभार लागणार नाही. एकूण प्रवास भाड्यापैकी ३० टक्क्यांवर १४ टक्के सेवा कर आणि स्वच्छ भारत उपकर (०.५ टक्का) लागू होणार आहे. या भाडेवाढीमुळे नवी दिल्ली-मुंबई प्रवासासाठी मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेत एसी-१ प्रवास भाडे २०६ रुपयांनी, तर नवी दिल्ली- हावडासाठी एस-३ चे प्रवास भाडे १०२ रुपयांनी वाढले. दिल्ली-चेन्नईसाठी एसी-२ चे भाडे १४० रुपयांनी वाढले आहे.

Leave a Comment