भाविकांसाठी बंद झाली केदारनाथ मंदिराची कवाडे

kedarnath
डेहराडून – येथील ११,७५५ फूट उंचीवर असलेल्या जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराची कवाडे कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टीला सुरुवात झाल्याने भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. आता मंदिराची कवाडे हिवाळा संपल्यानंतरच उघडण्यात येणार आहेत. सुमारे एक तासाची विशेष पूजा कवाडे बंद करण्यापूर्वी करण्यात आली.

प्रमुख पुजार्‍यांच्या उपस्थितीत या मोसमातील शेवटची पूजा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येत भाविक आणि मंदिर व्यवस्थापन समिती, तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष पूजेनंतर सकाळी आठ वाजता मंदिराची कवाडे बंद करण्यात आली, अशी माहिती केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी भीमाशंकर लिंग शिवाचार्य स्वामीजी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

या मंदिरातील भगवान शिवशंकराची मूर्ती केदारनाथ मंदिराची कवाडे बंद करण्यात आल्यानंतर वैदिक मंत्रोच्चारात श्रद्धापूर्वक उखी मठाच्या ओंकारेश्‍वर मंदिरात नेण्यात आली. संपूर्ण हिवाळाभर याच मंदिरात भगवान शिवाची पूजा करण्यात येणार आहे. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते, असे शिवाचार्य स्वामीजी यांनी सांगितले.

Leave a Comment