बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मोदींचा नक्शा उतरला परंतु तो नेमका कोणामुळे उतरला यावर आता वाद सुरू झाला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींचा नक्शा उतरला पाहिजे, असे वारंवार म्हटलेले होते. किंबहुना त्याच एका अर्थाचे वाक्य ते शब्द बदलून वारंवार बोलून दाखवत होते. परिणामी कॉंग्रेसचे काही नेते आता राहुल गांधींमुळेच बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाला असा दावा करायला लागले आहेत. एवढेच नव्हे तर आता राहुल गांधींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष व्हायला काही हरकत नाही. असाही तगादा पक्षातल्या प्रियंका विरोधी गटाकडून सुरू झाला आहे. हे सगळे राहुलपुराण सुरू असतानाच केरळमध्ये अशा काही घटना घडत होत्या की राहुल गांधींची ताजपोशी लांब पडावी.
कॉंग्रेसला धक्का
पक्षात काही वाईट घडले की राहुल गांधींचे अध्यक्ष होणे लांबणीवर पडते आणि पक्षाला भ्रष्टाचाराची एवढी मोठी परंपरा आहे की त्या परंपरेच्या साखळीतील एखादा तरी दुवा मध्येच असा काही प्रकट होतो की कॉंग्रेसच्या मागे लागलेला भ्रष्टाचाराचा ससेमिरा कधी संपायचा नाही असे वाटायला लागते. कॉंग्रेस पक्ष सत्तेवरून गेला असल्यामुळे केंद्रात तरी त्याला आता भ्रष्टाचार करण्याची संधी नाही. अन्यथा गेल्या वर्षभराच्या काळात निदान महिन्याला एक या दराने दहा-बारा तरी प्रकरणे उघड झाली असती पण पक्ष केरळात सत्तेवर आहे आणि तिथल्या मंत्र्यांनी कॉंग्रेसची भ्रष्टाचाराची परंपरा कायम ठेवण्याचा पण केला आहे. इकडे बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींचे नाव घेऊन स्वतःचेच दंड थोपटत होते. तेव्हा केरळात कॉंग्रेसचा भंडाफोड होत होता.
केरळमधल्या कॉंग्रेसपक्षीय सरकारचे अर्थमंत्री के. एम. मणी यांनी केरळमध्ये अंशतः दारूबंदी लागू करताना काही हॉटेल मालकांकडून ५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. केरळमधल्या कॉंग्रेसपक्षीय सत्ताधारी आघाडीतील केरळ कॉंगे्रस (मणीगट) या पक्षाचे नेते आहेत. मात्र त्यांच्या या लाचखोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असूनही त्यांची पुढे चौकशी होऊ नये असे प्रयत्न झाले. मात्र त्याच्या विरोधात मुख्य देखरेख आयुक्तांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाने ही चौकशी सुरू राहिली पाहिजे असा आदेश दिला. हा आदेश देताना न्यायालयाने जी टिप्पणी केली आहे. तिच्यामुळे के. एम. मणी यांना राजीनामा देणे भाग पडेल असे वृत्तपत्रांचे मत आहे. तसे झाल्यास बिहार निवडणुकीत न केलेल्या पराक्रमाबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेणार्या कॉंग्रेसच्या नेत्यांना आता तोंड लपवावे लागणार आहे.