‘अल्टो’ ठरली सर्वाधिक विकली जाणारी कार

alto-800
नवी दिल्ली: भारतात ‘मारुती – ८००’ या सर्वाधिक मागणी असलेल्या प्राथमिक श्रेणीतील कारला मागे टाकून तिची जागा ‘मारुती’च्याच ‘अल्टो’ने घेतली आहे. मागील १५ वर्षात ‘अल्टो’ची तब्बल २९ लाख वाहने विकली गेली आहेत.

‘अल्टो’ हे मॉडेल सप्टेंबर २००० मध्ये बाजारपेठेत आणण्यात आले. आतापर्यंत या मॉडेलच्या २९ लाख १९ हजार ८१९ गाड्या विकल्या गेल्या आहेत. ‘मारुती’ कंपनीला रसद पुरविणाऱ्या ‘मारुती -८००’ पेक्षा हा आकडा जास्त आहे.

कारच्या विक्रीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या २९ लाख ही संख्या गाठणे हे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे विपणन आणि विक्री विभागाचे कार्यकारी संचालक आर एस कासली यांनी सांगितले. या आकडेवारीवरून ‘अल्टो’ ही भारतीय ग्राहकांची प्रथम पसंती असल्याचे सिद्ध झाले असून किफायतशीर किंमत, अधिक इंधनक्षमता आणि देखभालीचा अत्यल्प खर्च यामुळे ‘अल्टो’ने हे स्थान प्राप्त केल्याचे ते म्हणाले.’मारुती – ८००’ला जो टप्पा गाठण्यासाठी २९ वर्ष लागली; तो ‘अल्टो’ने १५ वर्षात गाठला आहे.

Leave a Comment