लाखो बालकांना मिळणार जीवदान; बेबी लाईफ बॉक्स विकसित

baby
नवी दिल्ली : पायाभूत सुविधांचा भारतासारख्या देशात अभाव असल्याने लाखो लहान मुले दरवर्षी वजन कमी आणि अन्य कारणाने मृत्युमुखी पडतात. परंतु यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एका भारतीय विद्यार्थ्यांने एक बेबी लाईफ बॉक्स विकसित केला असून, या माध्यमातून बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यास मदत होणार आहे. त्याने अत्यंत कमी खर्चात हे इन्क्यूबेटर विकसित केले आहे.

इम्पिरियल कॉलेज लंडन आणि रॉयल कॉलेज ऑफ आर्ट येथे आयोजित स्पर्धेत इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणा-या मालव सांघवी याने लंडनच्या सेंट जेम्स पॅलेस येथे आयोजित स्पर्धेत त्यांनी बेबी लाईफ बॉक्स सादर केला. यासाठी या विद्यार्थ्याला तिसरा पुरस्कार मिळाला आहे. बेबी लाईफ बॉक्स हा वजन कमी असलेल्या लहान मुलांना ठेवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अत्यंत कमी खर्चात तयार करण्यात आलेले हे इन्क्यूबेटर असून, यातून नवजात अर्भकांची मूलभूत देखभाल करता येणे शक्य आहे. जन्मल्यानंतर अवघ्या २४ तासांत मरणा-या शिशूंचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. अर्थात, भारतात दरवर्षी तीन लाखांपेक्षा जास्त नवजात बालकांचा मृत्यू होतो. याचा विचार करून विद्याथ्र्याने बेबी लाईफ बॉक्स विकसित केला आहे. त्यामुळे नवजात बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणावर नियंत्रण मिळविता येणार आहे.

अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) पदवीधर सांघवी याने सांगितले की, आमच्या प्राथमिक संशोधनातून आमच्या हे लक्षात आले की, भारतात आरोग्याची देखभाल करणारे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रात सर्वसाधारण अडचणींचा सामना करण्यासाठी सुविधा आहेत. परंतु मुदतीपूर्वी जन्म आणि कमी वजन असलेल्या नवजात बालकांच्या देखभालीसाठी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्याचाच विचार करून हे इन्क्यूबेटर विकसित केले आहे. सांघवीने इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनच्या हॅकस्पेस कार्यक्रमात मिळालेल्या ५०० पाऊंडच्या मदतीने हा नमुना विकसित केला आणि आता जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रेडक्रॉस आणि बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसारख्या संघटनांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याचा विचार आहे, असेही त्याने म्हटले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment