व्यापा-यांनी धुडकावले मुख्यमंत्र्यांचे आदेश

toordal
मुंबई : बुधवारपासून १२० रुपये किलो तूरडाळ मिळणार, अशी शिवसेनेने केलेली घोषणा ही लोणकढी थाप ठरली असून शिवसेनेचे नाटक क्रमांक दोन सपशेल फसले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाळी कमी दराने विकण्याचे दिलेले आदेशही व्यापा-यांनी सपशेल धुडकावून लावल्याचे सर्वत्र दिसून आले.

या फसवणुकीमुळे भडकलेले सर्वसामान्य शिवसेनेच्या मुखपत्रातून जाहीर केल्याप्रमाणे १२० किलो दराने तूरडाळ नेमकी कुणाच्या घरात गेल्याचा सवाल विचारत आहेत. तूरडाळ अद्यापही १८० ते २०० रुपये किलो दरानेच विकली जात असल्याचे वास्तव समोर आले. महागाईने त्रस्त जनतेच्या ही फसवणूक जिव्हारी लागली असून सरकारने जप्त केलेली २५ लाख टन तूरडाळ नेमकी गेली कुठे? असा सवालही लोक आता विचारू लागले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा कलगीतुरा रंगल्यानंतर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या पूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन डाळींचे भाव कमी करण्याची मागणी करण्याचे नाटक केले. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून बुधवारपासून तूरडाळ १२० किलो दराने मिळेल, अशी बातमी शिवसेनेच्या मुखपत्रात मोठ्या थाटात बुधवारी ठळकपणे देण्यात आली. मात्र बुधवारी कोणत्याही दुकानात तूरडाळ १२० रुपये किलो दराने मिळत नसल्याचे निष्पन्न झाल्याने कल्याणमधील राजीनामा नाटकाप्रमाणेच शिवसेनेचे नाटक क्रमांक दोन सपशेल फसले असल्याचे स्पष्ट झाले तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेले तथाकथित आदेशही व्यापा-यांनी धुडकावून लावल्याचे दिसून आले आहे. तूरडाळ आजपासून १२० किलो दराने मिळणार, अशी बातमी वाचून अनेक गृहिणी तूरडाळ विकत घेण्यासाठी किराणा मालाच्या दुकानात गेल्या होत्या मात्र त्यांचा सपशेल अपेक्षाभंग झाला.

Leave a Comment