मंगळावरील वातावरण सौर वाऱ्यांमुळे नष्ट

mars
वॉशिंग्टन – एकेकाळी पाण्याचे प्रवाह आणि वातावरणाचे संरक्षण कसे नष्ट झाले; याचे विश्लेषण नासाने पहिल्यांदाच सविस्तरपणे मांडले आहे. प्रखर अशा सौर वाऱ्यांनी वातावरणातील महत्वाचे वायू आणि ग्रहावरील पाणी नष्ट केले; असे नासाच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

नासाच्या ‘मावेन’ (MAVEN)मोहिमेद्वारे ही माहिती जगासमोर आणण्यात आली. सौरवादळांच्या प्रभावामुळे एकेकाळी सार्द्र आणि उबदार असलेला मंगळ हा थंड आणि रुक्ष ग्रह बनल्याचे या संशोधातून स्पष्ट झाले आहे. सौर वाऱ्यांमुळे वातावरणातील प्राणवायू आणि कर्ब वायू नष्ट झाले. पाण्याची अनपेक्षित वेगाने वाफ झाली आणि मंगळावरील वातावरणाचे आवरण विरळ होत नष्ट झाल्याचे या संशोधनात आढळून आले आहे.

मंगळावर जीवसृष्टीला पोषक असे प्रवाही पाणी तसेच उबदार वातावरण होते. मात्र सौर वाऱ्यांमुळे प्रति सेकंद १०० ग्रॅम या वेगाने या ग्रहावरील वातावरण नष्ट होत गेले.

यावर्षी मार्च महिन्यात उठलेल्या सौरवादळामुळेही मोठ्या प्रमाणात मंगळावर विपरित परिणाम झाल्याचेही संशोधनात स्पष्ट झाले आहे. या सौरवादळांच्यामुळे सध्याची मंगळाची अवस्था वैराण प्रदेशात झाली आहे. त्यामुळे आता मंगळावर कितीही प्रयत्न केला तरी प्रवाही पाणी जास्तकाळ टिकूच शकणार नाही असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. याबाबतचा संपूर्ण निष्कर्ष ‘सायन्स अँड जियोफिजिकल रिसर्च लेटर्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Leave a Comment