भारतीय व्यवस्थेची घोडदौड सुरू: पंतप्रधान

modi
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रात सत्ता प्राप्त केल्यापासून देशाची अर्थव्यवस्था प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. ही छोट्या अंतराची दौड नाही; तर लांब पल्ल्याची घोडदौड आहे; असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

‘दिल्ली आर्थिक परिषदे’च्या उद्घाटन समारंभात मोदी बोलत होते. या कार्यक्रमाला अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, मुख्य अर्थसल्लागार अरविंद सुब्रमण्यम उपस्थित होते.

रालोआ सरकारने १७ महिन्यापूर्वी सत्ता हस्तगत केली; त्यावेळच्या परिस्थितीपेक्षा भारतीय अर्थव्यवस्था जोमाने वाढत असल्याचे सर्वच आर्थिक सर्वेक्षणातून दिसून येत आहे. सरकारने केवळ वृत्तपत्रांचे मथळे भरण्यासाठी नव्हे; तर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आर्थिक सुधारणांचा अवलंब केला आहे; असे पंतप्रधान म्हणाले.

सध्या भारताचा ‘जीडीपी’ वाढत आहे. महागाई नियंत्रणात आहे. रुपया स्थिर आहे. अर्थसंकल्पीय तूट कमी आहे. हे सर्व केवळ योगायोगाने अथवा अपघाताने नव्हे; तर सरकारच्या विचारपूर्वक नियोजनाने घडून आले आहे; असा दावा त्यांनी केला. जन धन योजने अंतर्गत उघडयात आलेल्या बचत खात्यांमध्ये २६ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. विदेशातील काळा अथवा करचुकवेगिरी करून जमविलेला पैसा बाहेर काढण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे तिजोरीत १० हजार ५०० कोटी रुपये जमा झाले आहेत; असेही पंतप्रधान म्हणाले.

Leave a Comment