नागपूर ग्रामीण भागातील पणत्यांना परदेशातून मागणी

motiram
नागपूर- दिवाळीचा सण अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. घरोघरी तेवणार्‍या पणत्यांशिवाय दिवाळी होऊ शकत नाही. त्यामुळेच गावोगावीचे कुंभार मातीच्या पणत्या बनविण्यात गुंतले आहेत. नागपूर जवळची व्याहडपेठ व कालडोंगरी पेठ ही छोटीशी गांवेही त्याला अपवाद नाहीत. मात्र त्यांचे खास वैशिष्ठ म्हणजे येथील पणत्यांना परदेशातून मोठी मागणी आहे. केवळ ५० घरे असलेला हा भाग. त्यातील ४० घरे कुंभारांची. हाताने तयार केलेल्या विविध प्रकारच्या पणत्या ही त्यांची खासियत. या पणत्या कमी तेल पितात आणि ३ ते ७ तासांपर्यंत जळत राहतात.

येथे नेहमीच्या पारंपारिक पणत्यांप्रमाणे सप्तदिप, पंचदिप, कासवाची जादूई पणती, लक्ष्मीपाद, कंदिल अशा विभिन्न प्रकारचे दिवे बनतातच पण येथील कलशही अतिशय वेगळे असतात. ज्येष्ठ कारागिर मोतीराम खांदेरे सांगतात, आम्ही हाताने फिरविण्याच्या चाकावर तसेच सौर उर्जेवर चालणार्‍या चाकावर पणत्या बनवितो. मात्र आजकाल माती मिळविणे जिकीरीचे बनले आहे. पूवी जवळच्या भागात उत्तम दर्जाची माती मिळत होती. मात्र नरसिंहराव पंतप्रधान असताना या भागाच्या दौर्‍यावर आले तेव्हा मातीची ही जमिन वनविभागाने ताब्यात घेतली. आता तेथील माती आणली तर ३० हजारांपर्यंत दंड पडतो. त्यामुळे विहीरी, नाले यातून माती आणावी लागते.

येथील पणत्यांना दुबई, ऑस्ट्रेलियातून मोठी मागणी आहे. या गावातील कुंभारांनी त्याची कला जपण्यासाठी आणि मातीच्या वस्तूंसाठी माती मिळविण्यात येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तेव्हा युतीचे सरकार आले तर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र युती सरकार येऊन वर्ष लोटले तरी कुंभारांची अडचण सोडविली गेलेली नाही.

Leave a Comment