केरळात हत्तींसाठी रुग्णवाहिका

elephant
तिरुअनंतपुरम्म : केरळातील रुग्णालयात आजारी आणि जखमी हत्तींना पोचविण्यासाठी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

उत्तर केरळातील जंगली हत्तींसाठी नंदनवन असलेल्या वायनाड अभयारण्यातील हत्तींसाठी राज्याच्या वन विभागाने विशेष डिझाईन तयार करण्यात आलेली रुग्णवाहिका सुरू केली आहे. लॉरी किंवा ट्रकचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात आले असून, आपात परिस्थितीत जखमी किंवा बेशुद्ध करण्यात आलेल्या हत्तींची वाहतूक किंवा मग हत्तीचे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग करण्यात येईल, असे वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिर्कायाने याबाबत माहिती देताना सांगितले. विशेष करून डिझाईन तयार करण्यात हे वाहन हत्तींसाठी सुविधाजनक असून, यामुळे या भागातील मानव-प्राणी संघर्ष कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. या आधुनिक वाहनामध्ये दोरी आणि प्राण्यांना उचलण्यासाठी क्रेनची व्यवस्था आहे.

शिवाय वाहतुकीच्या वेळी हत्तींना थंड वाटावे यासाठी पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, असे वायनाड अभयारण्याचे वॉर्डन पी. धनेश कुमार यांनी सांगितले. शिवाय वाहनात हत्तीच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आधी हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला लाकडाच्या खांबांचा वापर करावा लागत असे. या वाहनात प्राण्यांना लागणारे खाद्य आणि औषधांचा साठा करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment