आता घरकामासाठी बायकाही मिळणार ‘ऑनलाईन’

book-my
मुंबई: मोठ्या शहरांमध्ये विशेषत: नोकरी, व्यवसायासाठी बाहेर गावाहून येऊन स्थायिक होणाऱ्यांना घरकामासाठी बाई शोधणे ही कठीण गोष्ट असते. मात्र आता ‘बुक माय बाई डॉट कॉम’ या वेबसाईट द्वारे हे काम एका ‘क्लिक’वर होत आहे. त्यामुळे नोकरदारांची मोठी सोय होत असून घरकाम करणाऱ्या महिलांना रोजगार आणि सुरक्षितता मिळणेही सुलभ झाले आहे.

या वेबसाईटद्वारे मुंबई, पुणे, बंगळुरु आणि सुरत या शहरांमध्ये सेवा उपलब्ध करून दिली जाते. या ठिकाणी घरकाम करणाऱ्या 12 हजार महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून दर महिन्याला 500 हून अधिक महिलांना मासिक वेतन तत्वावर अथवा तात्पुरत्या स्वरूपाचे काम मिळवून दिले जाते; असा कंपनीचा दावा आहे. या महिलांना दरमहा सरासरी 3 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

घरकाम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील ही यंत्रणा उपयुक्त ठरत आहे. या महिलांची कामाच्या ठिकाणी छेडछाड झाल्यास; अथवा शारीरिक अत्याचार झाल्यास त्या या वेबसाईटच्या कार्यालयात जाऊन त्याला वाचा फोडू शकतात. अन्यथा आम्हाला अत्यंत तुच्छतेची वागणूक दिली जाते. छळ करण्यासाठी हक्काचे साधन म्हणून आमच्याकडे पाहिले जाते; असे; या वेबसाईटच्या माध्यमातून काम मिळालेल्या मुंबई येथील एका महिलेने सांगितले. त्याचप्रमाणे साप्ताहिक सुट्टी, कामाचे ठराविक तास या सुविधा मिळाल्याने कुटुंबासाठी अधिक वेळ देणे शक्य होत असल्याचेही त्या म्हणाल्या.
घरकामगार महिलांचे हे क्षेत्र असंघटित असले तरी त्यात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ काम करीत आहे. देशभरात सुमारे 40 लाख कामगार; विशेषत: महिला त्यात काम करीत आहेत. त्यामुळे याक्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी शासकीय स्तरावरून, स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात पावले उचलली जात आहेत आणि अशा वेबसाईटसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवसायाच्या मोठ्या संधीही या क्षेत्रात उपलब्ध आहेत.

Leave a Comment