काय हाती लागणार?

rajan
छोटा राजन याला अटक करून सरकार केवळ त्यालाच शासन करणार आहे की त्यातून अन्य काही गोष्टी साध्य करणार आहे याचा काही अंदाज येत नाही. कारण छोटा राजनची अटक ही दाऊद इब्राहिमला जेरबंद करण्यासाठी झालेली आहे असा सर्वांचाच अंदाज आहे. अर्थात सामान्य माणसाने असा अंदाज करावा एवढ्या राष्ट्रीय सुरक्षेच्या गोष्टी सोप्या नसतात. परंतु छोटा राजन पत्रकारांना ज्या मुलाखती देत आहे त्यातून तरी तो स्वतःपेक्षा दाऊद इब्राहिमवरच जास्त बोलत आहे. याचा अर्थ काय काढणार? त्याने दाऊद पाकिस्तानातच असल्याचे म्हटले आहे. त्याचा हा दाऊद मॅनिया विचारात घेतला असता तर, त्याची झालेली अटक ही दाऊद इब्राहिमला पकडण्याची तयारी म्हणूनच झालेली आहे या शंकेला बळकटी येते.

गुन्हेगाराच्या वाटा गुन्हेगारांनाच माहीत असतात. या न्यायाने छोटा राजन भारत सरकारच्या मदतीने दाऊद इब्राहिमला पकडून देऊ शकेल असे भारत सरकारला वाटत असावे. भारत सरकार आणि छोटा राजन मिळून दाऊदचा घात करू शकतात असे दाऊदलाही वाटते आणि दाऊदबरोबरच पाकिस्तान सरकारलासुध्दा वाटते. म्हणून पाकिस्तान सरकारने आता दाऊद भोवतीचे संरक्षक कडे अधिक मजबूत केले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसात दाऊदचे हस्तक घुसले असल्याच्या छोटा राजनच्या आरोपाला महत्त्व आले आहे.

दाऊदला पकडण्यासाठी भारत सरकारने पूर्वी एकदा छोटा राजनच्या मदतीने प्रयत्नही केला होता. परंतु दाऊद इब्राहिमच्या मुंबई पोलिसात घुसलेल्या लोकांनीच हा डाव हाणून पाडला. एकंदरीत दाऊदची माणसे मुंबई पोलिसात आहेत हे दिसून आले आहे. अर्थात सरकारी यंत्रणेमध्ये दाऊदबरोबरच छोटा राजनचीही माणसे घुसलेली आहेत. म्हणून आता छोटा राजनच्या नकली पासपोर्टचे प्रकरण पुढे आले आहे. त्याला ऑस्ट्रेलियातल्या भारतीय दूतावासातून भारतीय पासपोर्ट मिळाले आहे. नियमांचा विचार केला असता हे शक्य नाही. परंतु त्याला अगदी सहजपणे एका बनावट नावावर हा पासपोर्ट प्राप्त झाला आहे. त्याची माणसे परराष्ट्र खात्यात घुसलेली असल्याशिवाय हे शक्य नाही. एकंदरीत दाऊद काय की छोटा राजन काय या दोघांचीही माणसे शासकीय यंत्रणेत घुसलेली आहेत म्हणून त्यांचे बेकायदा व्यवहार सुखाने सुरू आहेत.

Leave a Comment