ट्विटरने आणले ‘हार्ट’वाले लाईक

twitter
मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय मायक्रोब्लोगिंग साईट् ट्विटरने यूझर्ससाठी नवी भेट आणली असून ट्विटरवर स्टार चिन्हाने एखादे ट्वीट फेव्हरिट करण्याचा असलेला पर्याय बदलून हार्ट हा नवा आयकॉन लाँच करण्यात आला आहे. मात्र ट्विटराईट्सना नव्या पर्यायाने विशेष फरक पडला नसल्याचे चित्र आहे.

लाईक्स असे स्टारऐवजी आलेल्या हार्ट आयकॉनला संबोधण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्ही फेसबुकवर स्टेटस आणि फोटो लाईक करता त्याप्रमाणे आता ट्विटरवरही एखादे ट्वीट लाईक करता येणार आहे. ट्विटरतर्फे ट्विटरचा वापर आणखी सोपा आणि यूझरफ्रेण्डली करण्याच्या दृष्टीने बदल करत असल्याचे सांगण्यात आले आहे. स्टार हे चिन्ह नव्या यूझर्सना संभ्रमात टाकत, मात्र हार्टमधून सकारात्मकता, पाठिंबा, सहभाग लाईक, लॉल, वॉव यासारख्या अनेक भावना पोहचवता येतील असे ट्विटरने व्हिडिओत म्हटले आहे.

या बदलानंतर ट्विटरवरील #TwitterHeart हा हॅशटॅग बराच काळ टॉप ट्रेण्डिंगमध्ये होता. बदलाच्या स्वागतासोबतच नाक मुरडणारे काही ट्वीट्स होते. स्टार काय वाईट होता का? आता किल्वर, इस्पिक, चौकटही आणणार का असे खिल्ली उडवणारे ट्वीट्सही यूझर्सनी केले. #WeWantFavButtonBack या हॅशटॅगसह अनेकांनी स्टार आयकॉन परत आणण्याची मागणी उचलून धरली आहे.

Leave a Comment