नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह या पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी देशाच्या आर्थिक विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकावर चर्चा करण्याची आपली तयारी आहे, अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केली आहे.
काँग्रेससोबत जीएसटीवर चर्चेची तयारी; अर्थमंत्री अरुण जेटली यांची भूमिका
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुद्यावर आपण राहुल गांधी यांच्यासोबतही चर्चा करणार आहात काय, असे विचारले असता, अर्थातच.. या पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा करण्यास मी तयार आहे. राहुल गांधी यांच्यासोबतही चर्चा करण्यास हरकत नाही. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्याची क्षमता या विधेयकात असल्याने, शक्य तितक्या लवकर त्यावर संसदेची मोहर उमटविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पुढील वर्षी १ एप्रिलपासून ते देशभरात लागू करण्याची सरकारची इच्छा आहे. पण, संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात जर हे घटनादुरुस्ती विधेयक पारित झाले नाही, तर ते १ एप्रिलपासून लागू होऊ शकणार नाही. त्यामुळे या विधेयकावरील कोंडी फोडण्यासाठी काँग्रेससोबत चर्चा आवश्यक आहे, असे त यांनी स्पष्ट केले.
मी एकटाच नाही, तर सरकारमधील कोणताही वरिष्ठ मंत्री काँग्रेसमधील नेत्यांसोबत चर्चा करण्यास तयार आहे. यासाठी काँग्रेसनेही समोर यावे, असे आम्हाला वाटते. आमच्यात राजकीय मतभेद असले, तरी आमच्यासाठी देशाचा विकास जास्त महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले.