सरोगसीच्या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने काहीशी कडक भूमिका घेतली आहे. परदेशातली दाम्पत्ये भारतात येऊन आपली अपत्ये भारतीय महिलांच्या पोटात ९ महिने वाढवतात. त्यांना आपल्या देशामध्ये या उपचारासाठी येणारा खर्च भारतापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्यामुळे त्यांचा भारताकडे ओढा आहे आणि त्यातून भारतालासुध्दा चांगली कमाई होत आहे. सध्या भारतातील डॉक्टर्स या उपचारातून २३० कोटी डॉलर्स एवढी कमाई दरसाल करत आहेत. खरे म्हणजे हा व्यवसाय देशाला परकीय चलन मिळवून देणारा ठरला आहे. पण तरीही सर्वोच्च न्यायालयाने या व्यवसायावर कायद्याचा अंकुश असावा असा आग्रह धरला आहे.
कान्हा कुणाचा, पान्हा कुणाचा?
या आग्रहामागची भूमिका समजून घेतली पाहिजे. एखाद्या महिलेला मूल होणे हा तिच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो आणि तो तिला मिळावा म्हणून भारतात हे उपचार केले जातात. या उपचारांना कायद्याचे बंधन नाही कारण त्यात एका महिलेचा आनंद गुंतलेला आहे. हे जरी खरे असले तरी आईच्या आनंदाबरोबरच मुलाच्या अधिकाराचाही विचार केला गेला पाहिजे. एखादे मूल जन्माला येते तेव्हा त्याला एक वर्षभर आईचे दूध मिळाले पाहिजे हा त्याचा अधिकार आहे. याचा विचार केला असता सर्वोच्च न्यायालयाची भूमिका योग्यच वाटते. कारण सध्याच्या पध्दतीमध्ये जी महिला ९ महिने दुसर्याचे मूल आपल्या पोटात वाढवते त्या महिलेला पान्हा फुटतो. ती त्या मुलाची दत्तक आई असली तरी ९ महिन्यांचे दोघांचे साहचर्य तिला पान्हा फुटण्यास कारणीभूत ठरते.
दुसर्या बाजूला ज्या बाईच्या बिजांडापासून तो गर्भ फलित झालेला असतो ती आई त्या मुलावर अधिकार सांगते. जैवशास्त्रदृष्ट्या तीच मुलाची आई असते परंतु ती मुलाची खरी आई त्या मुलाला स्तनपान देऊ शकत नाही. या गोष्टीचा कधी विचारच केला गेला नव्हता. आता तो केला जावा असे न्यायालयाला वाटते. त्या मुलाचा स्तनपानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी त्याच्या दोन मातांचा काही तरी संबंध असावा अशी कायद्यात दुरूस्ती करावी असे न्यायालयाचे म्हणणे आहे. म्हणूनच नातेसंबंधातच सरोगसीचा प्रयोग केला जावा अशी तरतूद या कायद्यात केली जाणार आहे. अन्यथा आता सुरू असलेल्या प्रकारांमध्ये जैवशास्त्रीय आई अमेरिकेतली आणि ९ महिने सांभाळ करणारी आई भारतातली असते. अमेरिकेतली आई भारतातल्या आईला ९ महिन्यांचे गर्भाशयाचे भाडे म्हणून काही लाख रुपये देते आणि मुलाला घेऊन निघून जाते. या प्रकारात दोघींचा परिचयसुध्दा नसतो. ते मूल मात्र दोघींनाही ओळखत असते. किंबहुना ते भारतातल्या आईला जास्त ओळखते.