चीनमध्ये कंडोम कंपन्यांच्या मुळावर उठले ‘हम दो हमारे दो’ धोरण

china-condom
बीजिंग – नुकतीच वन चाईल्ड पॉलिसी या धोरणात बदल करुन चीनमध्ये ‘हम दो हमारे दो’ असे नवीन धोरण जाहीर केले असून याचा परिणाम चीनच्या अवाढव्य लोकसंख्येवर होणार यात तीळमात्र शंका नाही. त्याचीच दुसरी बाजू म्हणजे याचा एक व्यावसायिक परिणाम लगेच दिसू लागला आहे. या धोरणानंतर कंडोम कंपन्यांचे शेअर झटक्यात उतरले. दुसरीकडे नवजात बाळांसाठी लागणाऱ्या उत्पादनांच्या शेअर्सनी चांगलीच उसळी घेतली.

बेबी पॅड, बाबागाडी, बाळाचे मालिशचे तेल, केसांची निगा राखण्यासाठीची उत्पादने आणि बाळांसाठीचे दूध तयार करणाऱ्या कंपन्यांची तर दिवाळीच झाल्याचे शेअर बाजारात दिसून आले. यामधील बहुतांश उत्पादने बनवणाऱ्या चायना चाईल्ड केअर कंपनीचे शेअर चांगलेच वधारले होते. न्यूझिलंडमध्ये तर दूध उत्पादन कंपन्यांना याची नुसती चाहूल लागताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र चीनमध्ये अत्यंत लोकप्रिय असे कंडोम तयार करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघाल्यासारखीच अवस्था झाली. जपानच्या ओकामोटो इंडस्ट्री या कंडोम तयार करणाऱ्या कंपनीचे शेअर चक्क १० टक्क्याने उतरले. ही कंपनी चीनला मोठ्या प्रमाणात कंडोम पुरवते.

Leave a Comment