द्यावीच लागणार ‘कॉल ड्रॉप’ची भरपाई

call-drop
नवी दिल्ली- दूरसंपर्क नियामक ‘ट्राय’ने कॉल ड्रॉपच्या भरपाईवरून आदळाआपट करणा-या मोबाईल कंपन्यांकडे दुर्लक्ष करताना नव्या नियमावलीबाबत ठाम भूमिका घेतली आहे.

कॉल ड्रॉप झाल्यास १ जानेवारीपासून त्याची ग्राहकांना भरपाई देण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. मात्र त्याच वेळी कंपन्यांनी उपस्थित केलेल्या काही समस्यांची पडताळणी करण्याबाबत अनुकूलता दर्शवली. नुकतीच भरपाई देण्यास भाग पाडल्यास कॉलदर वाढवून ग्राहकांकडूनच त्याची वसुली करण्याची धमकी मोबाईल कंपन्यांनी दिली होती. तसेच या भरपाईचा ग्राहकांकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता एयूएसपीआय आणि सीओएआय या दोन संघटनांनी व्यक्त केली होती. तसेच ट्रायच्या या नियमावलीला आव्हान देण्याची तयारीही केली आहे. तसेच तांत्रिकदृष्टय़ा ही नुकसान भरपाई देणे कितपत शक्य होईल याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

नवी नियमावली ही पूर्णपणे वैध आहे, हे आपण आधीच स्पष्ट केले आहे. याबाबत ट्राय मागे हटणार नाही की कमी करणार नाही. सुधारणार नाही आणि रद्दही करणार नाही. या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांनी तयारी करावी, अशा स्पष्ट शब्दात ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सुनावले.

ट्रायने नव्या नियमावलीनुसार कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकाला एक रुपया भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. दिवसाला तीन कॉल ड्रॉपसाठीच ही भरपाई मिळणार आहे. याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून होणार आहे. या नियमावलीमुळे कंपन्यांना दरदिवशी १५० कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment