कचरा विकणारी झाली ब्युटी क्वीन

beauty-queen
बँकॉक : थायलंडमध्ये ब्युटी क्विनचा किताब एका कचरा विकणा-या महिलेच्या कन्येने सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन जिंकला असून, याची आठवण ठेवत मुलीने ब्युटी क्विनचा किताब आईच्या पायावर ठेऊन तिचे आशीर्वाद घेतले. आशीर्वाद घेतानाचा हा फोटो व्हायरल झाला असून, यशाचे शिखर गाठूनही आपल्या आईच्या पायाशी लोळण घेणा-या या ब्युटी क्विनला जगभरातून सलाम केला जात आहे.

थायलंडमधील खानिट्था मिन्ट फासएंग असे या कन्येचे नाव असून, तिने मिस अनसेंसर्ड न्यूज थायलंड २०१५ या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत ती ब्युटी क्विन ठरली असून, हा किताब जिंकल्यानंतर ती आपल्या गावी आली आणि तिने थेट कचरा गोळा करीत असलेल्या आपल्या आईच्या पायाशी लोळण घेतली. विशेष म्हणजे तिच्या डोक्यावर ब्युटी क्विनचा ताज कायम होता. तशा पेहरावातच तिने आईच्या पायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
भारतीय उपखंडासह आशियाई देशात मोठ्या लोकांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे थायलंडमधील ब्युटी क्विननेही त्याच पद्धतीने आईचा आशीर्वाद घेतला आहे. भावनाविवश करणारा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याची जगभर चर्चा सुरू आहे. मागील महिन्यात ही स्पर्धा झाली होती. नुकतीच ती आपल्या घरी परत आली असून, घरी येताच तिने आईचा आशीर्वाद घेतला. विशेष म्हणजे यावेळी तिची आई रस्त्यातच कचरा गोळा करीत होती. मिन्टच्या डोक्यावर ब्युटी क्विनचा मुकुट होता. याबरोबरच स्पर्धेची रिबन बांधलेली होती आणि उंच हिलची चप्पलही घातलेली होती. त्या अवस्थेतच तिने आईचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मीडियाशी बोलताना तिने यात लाजण्याचा प्रश्नच येत नाही. ती माझी आई आहे. ती तिचे प्रामाणिकपणे काम करीत आहे. तिच्या अपार कष्टामुळेच मी पुढे जाऊ शकले. मी जे काही यश मिळविले, ते आईमुळेच, असेही ती म्हणाली.

Leave a Comment