चीनला मागे टाकून भारताची सोने खरेदीत आघाडी

gold
भारताने पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक सोने खरेदीदार असा लौकीक प्राप्त केला असून या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत भारताने आत्तापर्यत सोने खरेदीत १ नंबरवर असलेल्या चीनला पिछाडीला टाकले आहे. या नऊ महिन्यांच्या काळात भारतात तब्बल ६४२ टन सोने विकले गेले असल्याचे जीएफएमएस गोल्ड सर्वेक्षणात दिसून आले आहे. यात आयात केलेल्या सोन्याचे प्रमाण अधिक आहे.

भारतात गेल्या तिमाहीत सोने खरेदीत ५ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. सप्टेंबरला संपलेल्या या तिमाहीत १९३ टन सोने विकले गेले आहे. सोन्यातील रिटेल गुंतवणूक ३० टक्कयानी वाढून ती ५५ टनांवर गेली असल्याचेही दिसून आले आहे. गेले कांही महिने जगभरातच सोन्याचे दर मंदावले आहेत. भारतात ते २५ हजार रूपये १० ग्रॅमच्या प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे सणसमारंभ अथवा विवाहप्रसंगात सोने दर चढे असताना जुने दागिने विकून नवीन करण्याचे जे प्रमाण होते तेही या कालावधीत खूपच कमी झाले असल्याचेही सर्वेक्षणात दिसून आले आहे. सोने खरेदी करताना ग्राहक बार व कॉईनला अधिक प्राधान्य देत आहेत.

Leave a Comment