मधुमेहाचे स्वस्त आयुर्वेदिक औषध लवकरच बाजारात

ayurved
लखनऊ : देशभरातील कोट्यावधी मधुमेहींसाठी गोड बातमी असून केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन (सीएसआयआर) संस्थेने शास्त्रीय प्रयोगांनी सिद्ध केलेले मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध लवकरच बाजारात येणार आहे. या औषधाचे नाव बीजीआर-३४ असून त्याच्या १०० गोळ्यांसाठी अवघे ५०० रुपये मोजावे लागतील. याचाच अर्थ एक गोळी अवघ्या पाच रुपयांत मिळणार आहे.

याबाबत माहिती देताना राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत म्हणाले की, आयुर्वेदात नमूद केलेल्या चार वनस्पतींचा अर्क वापरून हे औषध तयार केले आहे. या औषधांच्या चाचण्या प्राण्यांवर केल्या आहेत. या औषधाचा शास्त्रीय अभ्यास झाला असून ते सुरक्षित व प्रभावी असल्याचे दिसले. क्लिनिकल चाचण्यांमध्ये या औषधाने ६७ टक्के प्रभाव दाखवला आहे. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. हे औषध टाईप-२ मधुमेहांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सीएसआयआरच्या दोन प्रयोगशाळा, राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्था, केंद्रीय सुगंधी द्रव्य संस्था यांच्या संयुक्त प्रयोगातून या औषधाची निर्मिती झाली आहे. या औषधाचे उत्पादन व मार्केटिंगचे काम आयमिल फार्मास्युटिकल्स प्रा. लिमिटेडला दिले आहे. हे औषध येत्या १५ दिवसांत बाजारात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयमिल फार्मास्युटिकल्स प्रा. लिमिटेडचे मार्केटिंग प्रमुख व्ही. एस. कपूर यांनी दिली.