आकाश या स्वस्तातील टॅब्लेटमुळे प्रकाशात आलेल्या कॅनडाच्या डेटाविंड कंपनीने अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनशी करार करून भारतात ९९९ रूपयांत स्मार्टफोन आणण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. या वर्षअखेर म्हणजे २८ डिसेंबर रोजी हा फोन सादर केला जाईल असे समजते. कारण हा दिवस रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचा जन्मदिवस आहे. डेटाविंड व रिलायन्स कम्युने आत्तापर्यंत ७ अँड्राईड फोन लाँच केले आहेत. त्यातील पॉकेट सर्फर टूजी फोर ए व पॉकेट सर्फर थ्रीजी फोर ए हे स्वस्त स्मार्टफोन अनुक्रमे १९९९ व २९९९ रूपयांना उपलब्ध करून दिले गेले आहेत.
अवघ्या १ हजारांत मिळणार डेटाविंडचा स्मार्टफोन
डेटाविंड आणि रिलायन्स कम्यु.चा स्मार्टफोन जगातील सर्वात स्वस्त फोन आहे असा कंपनीचा दावा अहे. लायनक्स आधारित ऑपरेटिंग सिस्टीम व आरकॉम सर्व्हीससह हा फोन दिला जाणार आहे. डेटाविंडचे सीईओ सुनीतसिंह तुली यांनी दिलेल्या माहितीनुसार या फोनचा मोह ग्राहकांना नककीच पडेल कारण या फोनसोबत इंटरनेट सेवा १ वर्षांसाठी मोफत दिली जाणार आहे. तसेच फेसबुक, व्हॉटसअप, ईमेलही १ वर्षासाठी मोफत वापरता येणार आहे. फोनची किंमत कमी करण्याच्या उद्देशाने अनेक योजना असून चीप बनविणार्या चीनी व तैवानी कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत असेही समजते.