आगामी वर्षात येणार ‘होंडा’ची ‘बीआर- व्ही एसयूव्ही’

honda
नवी दिल्ली: आगामी वर्षात ‘होंडा’ची ‘बीआर- व्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही’ ही नवी आरामदायी कार भारतीय बाजारपेठेत आणण्याची तयारी ठेवण्यात आल्याचे ‘होंडा कार्स इंडिया’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कात्सुशी इन्यून यांनी सांगितले.

दिल्ली येथे होणाऱ्या सन २०१६ च्या ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ही गाडी प्रदर्शित करण्यात येईल. ‘ब्रिओ’च्या धर्तीवर ही सात आसनी गाडी बनविली जाणार असून ‘मोबिलो एमपीव्ही’मधील काही घटकही या गाडीचे डिझाईन बनविताना वापरले जाण्याची शक्यता आहे. या कारचे जमिनीपासूनचे अंतर वाढविण्यात येणार आहे. या कारचे बाह्य आवरण काळ्या रंगाच्या प्लास्टिक क्लॅडिंगने आणविले जाणार असून १६ इंचाचे अॅलॉय व्हील्स या गाडीला बसविण्यात येणार आहेत.

‘होंडा बीआर- व्ही’ प्रमाणेच १.५ लीटर आय व्हीटेक पेट्रोल आणि १.५ लीटर आय डीटेक डिझेल इंजिन या गाडीला बसविण्यात येईल. ५ गिअर्सची गिअरबॉक्स किंवा स्वयंचलित सिव्हीटी असे दोन्ही पर्याय या कारमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.

‘होंडा’ची ‘बीआर- व्ही एसयूव्ही’चे उत्पादन कंपनीच्या तापुकारा येथील प्रकल्पात सन २०१६ च्या सुरुवातीला सुरू केले जाणार आहे. रिनॉल्ट डस्टर, ह्युंदाई क्रेटा आणि मारुती सुझुकी एस क्रॉस या गाड्यांशी ‘होंडा’ची ‘बीआर- व्ही एसयूव्ही’ला स्पर्धा करावी लागणार आहे.

Leave a Comment