नासाने घेतला अग्निबाणाच्या संरचनेचा आढावा

nasa
वॉशिंग्टन : आतापर्यंतच्या सर्वात शक्तिमान अग्निबाणाची (समान व मंगळ यान प्रक्षेपक) संरचना नासाने तयार केली असून त्याचा उपयोग माणसाला मंगळावर पाठवण्यासाठी करता येणार आहे. त्याची संरचना निश्चिती व काही सुट्या भागांच्या चाचण्या करण्यात यश आले आहे. या अग्निबाणाला मंगळाच्या प्रवासातील आव्हानांचा मुकाबला करावा लागणार असून त्याचे नाव स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) आहे.

नासाने गेल्या चाळीस वर्षांत प्रथमच मानवाला मंगळावर घेऊन जाणा-या अग्निबाणाची रचना केली आहे. नासाच्या ग्रह संशोधन यंत्रणा विकास विभागाचे उप सहायक प्रशासक बील हिल यांनी सांगितले की, एसएलएसची संरचना तयार करण्यात आली असून या अग्निाबणाची इंजिने व बूस्टर्स यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्या सर्व भागांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. मंगळ मोहिमेत अनेक आव्हाने आहेत पण या अग्निबाणाची संरचना व त्याच्या काही भागांच्या चाचणीमुळे एसएलएस अग्निबाणाच्या पहिल्या उड्डाणाच्या दिशेने पाऊल पडले आहे. त्याचा वापर अवकाशात दूरवर माणसाचे अस्तित्व निर्माण करण्याचा आहे. सीडीआर म्हणजे क्रिटीकल डिझाइन रिव्ह्यू तपासण्यात आला असून त्याला एसएलएस ब्लॉक १ असे म्हणतात. या पहिल्या भागाची क्षमता ७० मेट्रिक टन वजन वाहून नेण्याची आहे व त्याला दोन बुस्टर्स व आर एस २५ प्रकारची चार इंजिने आहेत. विभाग १ बी मध्ये सुधारणा करण्यात येत असून त्याची क्षमता १०५ मेट्रिक टन वजन वाहून नेण्याची आहे. विभाग २ मध्ये घन व द्रव इंधनावरचे बूस्टर्स वापरले तर त्याची क्षमता १३० मेट्रिक टन वजन वाहून नेण्याइतकी होईल. प्रत्येक टप्प्यात चार आरएस २५ इंजिने वापरली जाणार आहेत. या अग्निबाणाच्या रचनेची संरचना ११ आठवड्यात अभियंते, अवकाश अभियंते यांच्या १३ चमूंनी तपासली आहे. एकूण १००० पाने व १५० जीबी इतकी माहिती यात नासाच्या मार्शल स्पेस फ्लाईट सेंटर येथे तपासण्यात आली. आता पुढच्या टप्प्यात अग्निबाणाच्या रचनेस मान्यता देण्यात येईल. उत्पादन, जोडणी व चाचणी २०१७ मध्ये झाल्यानंतर ही मान्यता दिली जाईल.

Leave a Comment